सर्वपक्षीय कार्यकर्ते म्हणतात, आयात उमेदवार नको
By admin | Published: August 1, 2016 12:46 AM2016-08-01T00:46:43+5:302016-08-01T00:46:43+5:30
नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून हद्दवाढीने अस्तित्वात आलेल्या
नगरपरिषद निवडणूक : स्थानिक नेत्यांचा लागणार कस, नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी अनेक इच्छुक
सुरेंद्र राऊत यवतमाळ
नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून हद्दवाढीने अस्तित्वात आलेल्या प्रभागात उमेदवार देताना सर्वच राजकीय पक्षांचा कस लागत आहे. त्यातच आता बाहेरील आयतीत उमेदवार नको असे म्हणत सर्वच पक्षातील कार्यकर्त्यांनी दबाव आणणे सुरू केले आहे. तर काहींनी आतापासूनच उमेदवार निश्चित समजून प्रभागात अप्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केल्याचे चित्र आहे.
यवतमाळ नगरपरिषदेवर भाजपाची दीर्घकाळापासून सत्ता आहे. ही सत्ता कायम ठेवण्याचे आव्हान भाजपा नेत्यांपुढे आहे. तर पालिकेत हद्दवाढीने समाविष्ठ झालेल्या ग्रामीण भागात काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व होते. त्यामुळे नगरपरिषदेत सत्ता स्थापण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. या प्रमुख राजकीय पक्षांच्या लढतीत त्या त्या प्रभागातील उमेदवार कोण हेही महत्वाचे ठरणार आहे. शिवाय शिवसेनेकडून सध्यातरी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू आहे. बसपासुध्दा संपूर्ण शहरात उमेदवार उभे करण्याची चाचपणी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली नसली तरी ऐन वेळेवर कोणता पवित्रा घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकाच प्रभागातून निवडून आलेल्या विद्यमान नगरसेवकांना महिला आणि जातीय आरक्षणामुळे पर्यायी जागा निवडावी लगाणार आहे. त्यासाठी कोण पुढाकार घेतो अथवा आपल्या सहकाऱ्याच्या विरोधात लढणार काय याचीही चाचपणी केली जात आहे. विद्यमान नगरसेवकांपैकी कोणाला नाकारायचे आणि कोणाला उमेदवारी द्यायची असा पेच निर्माण होणार आहे. हा संभाव्य धोका ओळखूनच सत्ताधारी भाजपातील अनेक इच्छुकांनी आपल्या पध्दतीने उमेदवारीसाठी फिल्डींग लावणे सुरू केले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे अनेकांना लॉटरी लागली. आता याचाच फायदा नगरपरिषदेत होईल या आशेने भाजपामध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. भाजपात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी थेट वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहे. तर एका बाहेरच्या उमेदवाराने आपले तिकीट पक्के आहे, केवळ आरक्षणाची प्रतीक्षा असल्याचे सांगून जाहीर प्रचाराला सुरूवात केली आहे. यामुळे भाजपातील निष्ठावंताच्या गोटात खळबळ निर्माण झाली आहे. तर काँग्रेसकडून अद्याप पर्यंत कोणालाच कौल देण्यात आलेला नाही. भाजपातील सक्रिय गट आपल्या बाजूने कसा वळविता येईल, याचेही प्रयत्न होत आहे. मात्र काँग्रेसच नगरपरिषद निवडणुकीची जबाबदारी कोणावर सोपविणार हे अद्याप स्पष्ट नसल्याने अनेक इच्छुक बुचकळ््यात आहेत.