फेटाळलेले सर्व अर्ज वैध ठरविले
By admin | Published: July 5, 2015 02:23 AM2015-07-05T02:23:25+5:302015-07-05T02:23:25+5:30
शालेय कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी दाखल फेटाळलेले सर्व वीसही अर्ज जिल्हा उपनिबंधकांनी वैध ठरविले आहे.
२० नामांकन : शालेय कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूक
यवतमाळ : शालेय कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी दाखल फेटाळलेले सर्व वीसही अर्ज जिल्हा उपनिबंधकांनी वैध ठरविले आहे. यात सर्वाधिक अर्ज सहकार पॅनलचे आहेत.
या पतसंस्थेची निवडणूक १९ जुलै रोजी होत आहे. यासाठी ५१ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. छाननीच्या दिवशी किशोर बनारसे आणि नारायण डांगे यांच्या आक्षेपानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी २० अर्ज फेटाळले होेते. यात बहुतांश अर्ज सहकार पॅनलच्या उमेदवारांचे होते.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध संबंधित उमेदवारांनी जिल्हा उपनिबंधक जितेंद्र कंडारे यांच्याकडे अपिल दाखल केले होते. त्यांनी महाराष्ट्र सहकार अधिनियम १९६० चे कलम १५२ नुसार अपिल मंजूर करत अपिलार्थींची नावे वैध उमेदवारांच्या यादीत घेण्याचे निर्देश दिले आहे.
गेली दोन पंचवार्षिकपासून या संस्थेवर सहकार पॅनलची सत्ता राहिली आहे. संपूर्ण जिल्ह्यातील दोन हजार ५५० मतदार १५ संचालक निवडून देणार आहे. निरज डफळे, विजय वीसपुते, राजेश पुरी, भारत गारघाटे, गुलाब चव्हाण या मावळत्या संचालकांसह इतर उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहे. (वार्ताहर)