बाजार समितीचे सर्व शेड तुरीने फुल्ल
By Admin | Published: May 23, 2017 01:22 AM2017-05-23T01:22:41+5:302017-05-23T01:22:41+5:30
नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून येथील बाजार समितीच्या यार्डात शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी झुंबड उडाली आहे.
राळेगाव : ८५४ शेतकऱ्यांना मोजणीची प्रतीक्षा, समिती सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : नाफेडचे तूर खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून येथील बाजार समितीच्या यार्डात शेतकऱ्यांची तूर विक्रीसाठी झुंबड उडाली आहे. त्यामुळे सर्व शेड आणि ओटे हाऊसफुल्ल झाले आहेत. आता बाजार समितीत शेतकऱ्यांची तूर उतरविण्यासाठी जागाच शिल्लक राहिली नाही. त्यामुळे तूर विक्रीकरिता केवळ नोंदणी केली जात आहे. मोबाईल क्रमांकासह आवश्यक ती इतर माहिती नोंदवून घेतली जात आहे. जागा उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांना तुरी विक्रीसाठी आणण्याकरिता सूचना केली जाणार आहे. बाजार समितीत असलेल्या तुरीचा काटा करण्यास विलंब लागणार आहे. पुढे पावसाची शक्यता लक्षात घेता तूर ओली होणार नाही याची दक्षता बाजार समितीस्तरावर घेतली जाणार आहे.
आतापर्यंत बाजार समितीत ८५४ शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणली आहे. एकूण चार काट्यांवर दररोज तुरीची तोलाई होत आहे. नाफेडच्या निकषाप्रमाणे खरेदी करताना चाळणी लावून मोजणी केली जात आहे. काही शेतकरी मागील चार ते पाच दिवसांपासून मुक्कामी आहेत. सद्यस्थितीत १५ हजार क्विंटलहून अधिक तूर विक्रीसाठी आली आहे.
चुकाऱ्यास विलंबाची शक्यता
नाफेडने तुरीची खरेदी सुरू केली. परंतु चुकाऱ्यास विलंब होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांची तूर खरेदी केल्यानंतर वेअर हाऊसला जमा केली जाते. यानंतरची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम आॅनलाईन जमा केली जाते. यासाठी किमान दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो, अशी स्थिती आहे. या बाबीला नाफेडचे अधिकारी कारभारी शिंदे यांनीही दुजोरा दिला आहे.
शेतकऱ्यांची तूर सुरक्षित - प्रफुल्ल मानकर
बाजार समितीच्या यार्डात असलेली शेतकऱ्यांची सर्व तूर सुरक्षित आहे. बाजार समितीने त्यादृष्टीने सुरक्षा व्यवस्था केली आहे. शेतकऱ्यांना त्रास होवू नये यासाठी केवळ नोंदणी केली जात आहे. तूर विक्रीसाठी आणण्याविषयी त्यांना मोबाईलसह इतर माध्यमातून सूचना दिल्या जाणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती अॅड. प्रफुल्ल मानकर यांनी दिली.