एसटी कर्मचाऱ्यांचे भत्ते; थकबाकीचा सुसाट वेग, ६४ महिन्यांचा महागाई भत्ता रखडला

By विलास गावंडे | Published: February 25, 2024 09:53 PM2024-02-25T21:53:29+5:302024-02-25T21:53:55+5:30

वार्षिक वेतनवाढीचीही रक्कम मिळाली नाही

Allowances of ST employees; Slow pace of arrears, 64 months dearness allowance stopped | एसटी कर्मचाऱ्यांचे भत्ते; थकबाकीचा सुसाट वेग, ६४ महिन्यांचा महागाई भत्ता रखडला

एसटी कर्मचाऱ्यांचे भत्ते; थकबाकीचा सुसाट वेग, ६४ महिन्यांचा महागाई भत्ता रखडला

विलास गावंडे/यवतमाळ: एसटी कर्मचाऱ्यांची विविध भत्त्याची रक्कम दीर्घकाळ थकीत राहत आहे. ६४ महिन्यांच्या महागाई भत्त्याची रक्कम रखडली आहे. शिवाय, वार्षिक वेतनवाढीची ६७ महिन्यांची थकबाकी आहे. विशेष म्हणजे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भत्त्यापेक्षा एसटी कर्मचाऱ्यांना चार टक्के कमी महागाई भत्ता मिळत आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्याची तरतूद आहे. एसटी कर्मचाऱ्यांची जुलै २०१८ पासून डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण ६४ महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी प्रलंबित आहे. महाराष्ट्र शासन निर्णयानुसार १ जुलै २०२३ पासून महागाई भत्त्याचा दर ४२ वरून ४६ टक्के करण्यात आलेला आहे; परंतु सध्या एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्क्यांप्रमाणेच महागाई भत्ता दिला जात आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर त्यातील वार्षिक वेतनवाढीचा दर आणि घरभाडे भत्त्याच्या दर एसटी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येईल, अशा सूचना प्रसारित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार एसटी कर्मचाऱ्यांच्या वार्षिक वेतनवाढीचा दर दोन टक्क्यावरून तीन टक्के करण्यात आला; परंतु १ एप्रिल २०१६ पासून ३० ऑक्टोबर २०२१ पर्यंत वार्षिक वेतनवाढीची एक टक्क्याची रक्कम एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही.

वेतनवाढ आणि घरभाडे भत्त्याची रक्कम थकीत राहत असल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना भत्ते लागू करण्यात आल्यानंतर तेथून काही महिन्याने एसटी कर्मचाऱ्यांना लागू होतात. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ टक्के होऊन आठ महिन्यांचा काळ लोटला. एसटी कर्मचाऱ्यांची ४२ टक्क्यांवरच बोळवण सुरू आहे. शिवाय थकबाकीही तातडीने दिली जात नाही. परिणामी कर्मचाऱ्यांची महामंडळाकडे थकबाकीची रक्कम वाढत जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोट

एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचे थकीत पैसे मिळावेत यासाठी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना पत्र देण्यात आले आहे. आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून हा प्रश्न मांडला जाईल. होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात थकीत रकमेसाठी तरतूद करावी, ही अपेक्षा आहे.
मुकेश तिगोटे, सरचिटणीस
महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)

Web Title: Allowances of ST employees; Slow pace of arrears, 64 months dearness allowance stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.