साथरोग बळावण्याचा धोका वाढला
By admin | Published: August 9, 2015 12:06 AM2015-08-09T00:06:10+5:302015-08-09T00:06:10+5:30
पावसाळ्यात होणाऱ्या आजारावर नियंत्रणासाठी कार्यरत असलेला ‘हिवताप’ विभागच अधू झाला आहे.
‘हिवताप’वर ताण वाढला : जनजागृतीसाठी कर्मचाऱ्यांचा तुटवडा, सर्वेक्षणात चालढकल होण्याची भीती
यवतमाळ : पावसाळ्यात होणाऱ्या आजारावर नियंत्रणासाठी कार्यरत असलेला ‘हिवताप’ विभागच अधू झाला आहे. नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने साथरोगाच्या रुग्णांचे परिणामकारक सर्वेक्षण होण्याविषयी साशंकता आहे. यामुळे या आजाराचे रुग्ण बळावण्याचा धोका वाढला आहे. शासनस्तरावरून या विभागाकडे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष चिंतेची बाब ठरली आहे.
पावसाचे पाणी साचून राहत असल्याने वाढणारा डासांचा प्रादूर्भाव आणि दुर्गंधी ही बाब जलजन्य आजारास कारणीभूत ठरणारी आहे. मलेरिया, डायरिया यासह डेंग्यूसारखे गंभीर आजार मोठ्या प्रमाणात फैलावण्याची भीती आहे. हा आजार होऊ नये यासाठी जनजागृती आणि उपाययोजना करण्यासाठी हिवताप निर्मूलन विभागाकडे पुरेशी यंत्रणा नाही. आस्थापना विभाग ते प्रत्यक्ष गावपातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाणवा या विभागात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, आरोग्य पथक आदी ठिकाणी सेवा देण्यासाठी हिवताप विभागाकडे आवश्यक तेवढे कर्मचारी नाहीत. विशेष म्हणजे साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य सहायक, आरोग्य कर्मचारी या पदांवरील कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी आहे. आरोग्य सहायकाचे ४८ पदे मंजूर आहेत. यातील १८ पदे अजूनही रिक्त आहेत. आरोग्य कर्मचारी १८० मंजूर असताना प्रत्यक्ष १२० कार्यरत आहेत. ६० रिक्त पदे भरण्याची प्रतीक्षा आहे. याशिवाय आस्थापना विभागालाही हिवताप चढला आहे. या विभागातील रिक्त पदांमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांची माहिती गोळा करणे, वरिष्ठांंना माहिती सादर करणे, साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करून घेणे याबाबी रखडल्या जात आहे. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. जागोजागी गटार तयार झाली आहे. सांडपाणी अडल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. या परिस्थितीत हिवताप विभागाच्या यंत्रणेपुढे साथरोग नियंत्रणाचे मोठे आव्हान आहे. (वार्ताहर)