कपाशीच्या फुलांवर अळ्यांचे आक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 10:45 PM2018-08-04T22:45:09+5:302018-08-04T22:45:45+5:30
गतवर्षीपासून बीटी कपाशीवर अळ्यांचे आक्रमण वाढले आहे. एवढेच नाही तर, यावर्षी कपाशीच्या बहुतांश फुलावर अळ्यांचा पादुर्भाव आढळून येत आहे. बोंडअळीच्या संकेतामुळे शेतकरी वर्गामध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : गतवर्षीपासून बीटी कपाशीवर अळ्यांचे आक्रमण वाढले आहे. एवढेच नाही तर, यावर्षी कपाशीच्या बहुतांश फुलावर अळ्यांचा पादुर्भाव आढळून येत आहे. बोंडअळीच्या संकेतामुळे शेतकरी वर्गामध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
बीटी कपाशीवर कुठलीही अळी येणार नाही, असा दावा कंपन्यांकडून केला गेला. मागील वर्षी हा दावा फोल ठरला. त्यामुळे अनेकांच्या शेतीची वाताहत झाली. परंतु कपाशीला सक्षम पर्याय उपलब्ध नसल्यामुळे अनेकांनी पुन्हा यावर्षी कपाशीची लागवड केली. नाही म्हटले तरी प्रत्येक कपाशी लागवड केलेल्या शेतकऱ्यांमध्ये बोंडअळीची धाकधुक होतीच. ती आता खरी ठरायला लागली आहे. अनेकांच्या शेतातील कपाशी फुलावर आली. या फुलात अळी आढळून येत आहे. हीच अळी बोंडामध्ये प्रवेश करुन पूर्ण बोंड खराब करते, याचा मागील वर्षी अनुभव आलेला आहे.
बोंडअळीचे नियंत्रण करण्यासाठी कामगंध सापळे व प्रकाश सापळे (लाईट स्ट्रॅप) लावण्याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी ही उपाययोजना अंमलात आणली. परंतु या प्रयोगामुळे बोंडाची अळी पूर्णत: आटोक्यात येईल, अशी स्थिती नाही. कारण बहुतांश फुलात अळीचा पादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शासकीय पातळीवरुन अळीला आटोक्यात आणण्यासाठी योग्य मार्गदर्शन औषधांची गरज आहे. कपाशीवर बोंडअळीचे प्रमाण अधिक वाढण्यापूर्वी या उपाययोजना आवश्यक आहे.
शेतकरी दशोधडीला लागणार - आनंदराव जगताप
यावर्षीही फुलावर अळी आली. हीच अळी बोंडात जाते. माझ्या शेतात सर्व उपाययोजना करुनही अळी आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे अळीच येणार नाही, असे संशोधन करुन बियाणे निर्माण करणे गरजेचे आहे. नाही तर शेतकरी वर्ग दशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही, अशी माहिती परसोडीचे सरपंच तथा प्रगतिशील शेतकरी आनंदराव जगताप यांनी दिली.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरुच- कृषी अधिकारी
अळीला अटकाव करण्यासाठी मार्गदर्शन केले जात आहे. यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळत आहे. अळीला नष्ट करण्यासाठी निंबोळी अर्काचा फवारा मारण्याचा सल्ला देण्यात येत आहे, अशी माहीती पंचायत समितीचे कृषी अधिकारी किशोर अंबरकर यांनी दिली.