साथीतही हापकीनचे औषध आले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 09:30 PM2018-09-24T21:30:36+5:302018-09-24T21:31:19+5:30
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला औषधी पुरवठ्याचे कंत्राट ‘हापकीन’ला देण्यात आले होते. त्यासाठी दीड कोटी वर्गही केले गेले. एमआयआर मशीनसाठीही १३ कोटी वेगळे देण्यात आले. मात्र त्यानंतरही हापकीन महामंडळाने पावसाळ्यात साथीचे थैमान सुरू असतानासुद्धा औषधी पुरवठा केला नाही.
रूपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला औषधी पुरवठ्याचे कंत्राट ‘हापकीन’ला देण्यात आले होते. त्यासाठी दीड कोटी वर्गही केले गेले. एमआयआर मशीनसाठीही १३ कोटी वेगळे देण्यात आले. मात्र त्यानंतरही हापकीन महामंडळाने पावसाळ्यात साथीचे थैमान सुरू असतानासुद्धा औषधी पुरवठा केला नाही.
संपूर्ण जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले आहे. या रोगाला नियंत्रित करण्यासाठी स्थानिक पातळीवरून औषधांची खरेदी के ली जात आहे. या व्यतिरिक्त लागणाऱ्या औषधांचा पुरवठा करण्याची जबाबदारी हापकीन महामंडळाला देण्यात आली होती. वर्षभराच्या औषधांचा करारही केला. मात्र प्रत्यक्षात ही औषधी वैद्यकीय महाविद्यालयाला पाठविलीच गेली नाही. राज्यभरातच ही स्थिती असल्याची गंभीरबाब पुढे आली आहे. याचा फटका सर्वसामान्य रुग्णांना बसतो आहेत.
जिल्ह्यामध्ये अपघातग्रस्तांचे निदान करताना एमआरआय मशीन महत्वाची आहे. त्याची मागणी वैद्यकीय महाविद्यालयाकडून करण्यात आली आहे. त्याकरिता साडेतेरा कोटी रूपयांचा निधी हापकीन महामंडळाकडे वळता करण्यात आला. यानंतरही हापकीनने वैद्यकीय महाविद्यालयाला एमआरआय मशीन पाठविलीच नाही. यामुळे जिल्ह्यातील रूग्णांना उपचारासाठी दुसºया जिल्ह्यावरच विसंबून रहावे लागत आहे. हापकीनकडून औषधी पुरवठा न होण्यामागील नेमकी कारणे काय? हे अस्पष्ट आहे. लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
जिल्ह्यात डायरियाचे १३४३ रुग्ण
जिल्ह्यात एप्रिलपासून डायरियाचे रूग्ण वैद्यकीय महाविद्यालयात भरती होत आहे. दरमहिन्यालाच डायरीचे रूग्ण दाखल होत आहे. आतापर्यंत १३४३ रूग्णावर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आले. कॉलराचे ११० रूग्ण भरती करण्यात आले. तर ३१ आॅगस्टपासून स्क्रब टायफसचे ५४ रूग्ण आणि सप्टेंबरपासून डेंग्यूचे ६४ रूग्ण दाखल झाले आहेत.
फवारणी विषबाधितांचा आकडा पोहोचला १४० वर
जुलैपासून फवारणीमुळे विषबाधा झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांचा आकडा १४० वर पोहोचला आहे. यातील दोन विषबाधित रूग्ण सध्या उपचार घेत असून इतरांना उपचाराअंती सुटी देण्यात आली.
साथरोगाचे मोठे आक्रमण झाले आहे. या साथीला नियंत्रित करण्यासाठी स्थानिक स्तरावर औषधांची खरेदी करण्यात आली. साथरोग नियंत्रणासाठी वैद्यकीय महाविद्यालयाची यंत्रणा पूर्णत: प्रयत्न करीत आहे.
- मनीष श्रीगिरीवार
अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय