परीक्षा झाल्या रद्द, तरी खेड्यापाड्यातील विद्यार्थी मात्र अभ्यासात मग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 05:00 AM2021-04-05T05:00:00+5:302021-04-05T05:00:02+5:30
पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या घरच्या घरीच अभ्यास व्हावा यासाठी व्हाॅटस्अपवर अभ्यासमाला पाठविली जात आहे. त्यात विद्यार्थ्यांना शाळेच्या यू-डायस क्रमांकासह नोंदणी करून प्रश्न सोडवावे लागतात. उपक्रमाच्या १९ व्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ५४ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांनी या उपक्रमात नोंदणी केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनामुळे शाळा बंद असूनही व्हाॅटस्अपद्वारे शिक्षण विभागाने स्वाध्याय उपक्रम सुरू केला आहे. सुरुवातीला जिल्ह्यातील अत्यल्प विद्यार्थ्यांचा प्रतिसाद होता. त्यामुळे राज्यात यवतमाळचा क्रमांक शेवटी होता. मात्र गेल्या अवघ्या आठवडाभरात जिल्ह्यातील दीड लाख विद्यार्थ्यांनी स्वाध्याय मालिकेत सहभाग नोंदवून जिल्ह्याला १३ व्या क्रमांकावर विराजमान केले आहे. विशेष म्हणजे पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द झाल्या आहे. तरीही खेड्यापाड्यातील विद्यार्थी दररोज मन लावून स्वाध्याय सोडवित आहे.
पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांच्या घरच्या घरीच अभ्यास व्हावा यासाठी व्हाॅटस्अपवर अभ्यासमाला पाठविली जात आहे. त्यात विद्यार्थ्यांना शाळेच्या यू-डायस क्रमांकासह नोंदणी करून प्रश्न सोडवावे लागतात. उपक्रमाच्या १९ व्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील चार लाख ५४ हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ पाच ते सहा हजार विद्यार्थ्यांनी या उपक्रमात नोंदणी केली होती. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळचा क्रमांक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या यादीत शेवटी होता. मात्र २० व्या आठवड्यात शिक्षण विभागाने सर्व संबंधित यंत्रणेच्या बैठका घेऊन विद्यार्थी सहभाग वाढविला. त्यातून तब्बल एक लाख ३४ हजार १९६ विद्यार्थ्यांनी स्वाध्यायसाठी नोंदणी करून एक लाख ३० हजार ३३९ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय यशस्वीपणे पूर्ण केला. त्यामुळे जिल्ह्याचा क्रमांक ३६ वरून थेट १३ असा वर चढला आहे. सध्या शुक्रवारपासून २१ व्या आठवड्याचा स्वाध्याय सोडविणे सुरू झाले असून प्रतिसाद वाढत आहे. रविवारपर्यंत ५६ हजार ६९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी करून ५७ हजार २४ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय पूर्ण केला. विशेष म्हणजे दर दोन तासांनी हा आकडा वाढत आहे. पहिली ते आठवीच्या परीक्षा होणार नसल्यातरी स्वाध्याय उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे शिक्षण विभागाला परीक्षेशिवायही शक्य होणार आहे.
सुरुवातीला जाणीवजागृती नसल्याने स्वाध्याय उपक्रमात विद्यार्थी सहभाग कमी होता. मात्र मागील आठवड्यापासून सर्व गटशिक्षणाधिकारी, केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, साधन व्यक्ती यांच्या झूम मिटींग पंचायत समितीनिहाय तसेच केंद्रनिहाय घेतल्या. आता सहभाग वाढत आहे.
- प्रमाेद सूर्यवंशी
शिक्षणाधिकारी, यवतमाळ.
दहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
एप्रिलच्या शेवटी दहावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. यंदा कोरोनामुळे शाळेत फारसा अभ्यास करता न आलेल्या विद्यार्थ्यांना घर बसल्या स्वाध्याय मालिकेमुळे अभ्यास ‘पक्का’ करण्यास हातभार लागत आहे. मध्यंतरी नोव्हेंबर-डिसेंबर आणि जानेवारीमध्ये काही दिवस वर्ग भरले होते. तेव्हाचे मार्गदर्शन लक्षात ठेवून आता मोबाईलवर येणारे प्रश्नसंच सोडवून परीक्षेच्या तोंडावर विद्यार्थ्यांना उजळणी करता येत आहे. त्यामुळेच या आठवड्यात स्वाध्याय उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.