अर्धी दिवाळी उलटली तरी अनेकांना मिळाली नाही रवा, डाळ, साखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2022 08:55 PM2022-10-26T20:55:33+5:302022-10-26T20:56:19+5:30
अर्ध्या दिवाळीनंतर अनेकांना रवा, डाळ, साखर, तेल मिळाले. यातून ग्राहकांचा हिरमोड झाला. जिल्ह्यातील पाच लाख ७७ हजार ८१ कुटुंबाला आनंदाचा शिधा मिळणार होता. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब या शिध्याच्या प्रतीक्षेत होते. दिवाळीपूर्वी मोजक्याच ग्राहकांच्या घरात हा शिधा पोहोचला. मात्र, अनेकांच्या कुटुंबात अजूनही हा शिधा मिळालेला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य शासनाने आनंदाचा शिधा दिवाळीपूर्वी गोरगरिबांच्या घरात पाेहोचेल, असा विश्वास व्यक्त केला होता. घोषणा झाली मात्र वस्तूंचा पुरवठा झालाच नाही. अर्ध्या दिवाळीनंतर अनेकांना रवा, डाळ, साखर, तेल मिळाले. यातून ग्राहकांचा हिरमोड झाला.
जिल्ह्यातील पाच लाख ७७ हजार ८१ कुटुंबाला आनंदाचा शिधा मिळणार होता. यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब या शिध्याच्या प्रतीक्षेत होते. दिवाळीपूर्वी मोजक्याच ग्राहकांच्या घरात हा शिधा पोहोचला. मात्र, अनेकांच्या कुटुंबात अजूनही हा शिधा मिळालेला नाही.
जिल्ह्याला आणखी साखरेच्या दोन लाख ४२ हजार ९०६ कीट, रव्याच्या तीन लाख १९ हजार ९६१ कीट, चणा डाळीच्या तीन लाख १६ हजार ९०० कीट, पामतेलाच्या ३५ हजार ८७७ कीट, तर रिकाम्या ४१ हजार पिशव्या आवश्यक आहे. या साहित्याला प्राप्त करण्यासाठी आणखी चार-पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे.
दुकानदाराच्या तोंडाला फेस
१०० रुपयांची कीट घेण्यासाठी ग्राहकांच्या रांगा असल्या तरी मोजक्याच ग्राहकांना या वस्तू मिळणार असल्याने इतर ग्राहकांकडून दुकानदार टार्गेट झाले.
चार केंद्रांवर पूर्ण माल पोहोचला
चार कीट पैकी एकही वस्तू उपलब्ध झाली असेल तर ती तत्काळ वितरित करा, अशा सूचना असल्याने पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील कळंब, मारेगाव, शेंबाळपिंपरी आणि ढाणकी केंद्रावर कीटमधील काही वस्तू पूर्णत: पोहोचल्या.
दिवाळीनंतर मिळणार कीट
५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहकांना ही कीट मिळाली असली तरी अजूनही अर्ध्यापेक्षा अधिक ग्राहक कीट मिळावी म्हणून प्रतीक्षा करीत आहे. मात्र, कीट पोहोचण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस लागणार आहे. यामुळे दिवाळी झाल्यानंतरच ही कीट अनेक गावांमध्ये पोहोचेल, अशी स्थिती आहे. यातून ग्राहकांमध्ये संतापाची लाट आहे.
लाभार्थी काय म्हणतात...
आम्हाला दिवाळीनंतर कीट मिळणार असेल तर त्याचा काय उपयोग हे समजलेच नाही. आमची दिवाळी अंधारात गेली आहे. नियोजन नसल्याने सर्वसामान्यांची शोभा सरकारकडून झाली आहे.
- मंगला गेडाम, लाभार्थी
अनेक येरझारा मारल्यानंतरही दुकानदारांकडून साहित्य आलेच नसल्याचे सांगितले गेले. सरकारने घोषणा केली नसती तर त्याचे वाईटही वाटले नसते. मात्र, केवळ दिखावा झाला आहे.
- संजय आत्राम, लाभार्थी
शेवटच्या ग्राहकापर्यंत वाटप
प्रत्येकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. शेवटच्या ग्राहकापर्यंत याचे वाटप होणार आहे. पुरवठ्यामध्ये विलंब होत असल्याने हा प्रश्न निर्माण झाला. मात्र, कुणीही वंचित राहणार नाही. याची संपूर्ण खबरदारी घेतल्या गेली आहे.
- सुधाकर पवार,
जिल्हा पुरवठा अधिकारी