लस घेऊनही अनेकांची ऑनलाइन नोंद नाही, पांढरकवडातील प्रकार : काही जणांना दुसऱ्या डोसचे प्रमाणपत्र नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:31 AM2021-09-02T05:31:02+5:302021-09-02T05:31:02+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड लसीकरण प्रमाणपत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे कुठेही प्रवेश मिळविण्यासाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र आवश्यक झाले आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड लसीकरण प्रमाणपत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे कुठेही प्रवेश मिळविण्यासाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र आवश्यक झाले आहे. मात्र, तालुक्यातील काही नागरिकांनी लस घेऊनही त्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काहींनी केंद्रांवर जाऊन लसीचा डोस घेतला. मात्र, लसीकरण केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून लस घेणाऱ्याची योग्य माहिती ऑनलाइन समाविष्ट न झाल्याने लसीकरण प्रमाणपत्रावर त्रुटी दिसून येत आहेत, तसेच काही तांत्रिक बिघाडामुळे पहिला डोस घेऊनही काहींना पहिल्या डोसचे प्रमाणपत्र मिळाले नाही, तर कुणाला दोन्ही डोस घेऊनही पहिला डाेस घेतल्याचेच प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. काहींच्या प्रमाणपत्रात नाव चुकीचे, तर काहींच्या प्रमाणपत्रात लिंग चुकीचे, अशा चुकांमुळे अनेकांची डोकेदुखी वाढली आहे. कुणाचे नाव चुकीचे, तर कुणाचे लिंग लसीकरण प्रमाणपत्रामध्ये अनेकांचे नाव चुकीचे असल्याचे दिसून येते. मात्र, काहींच्या बाबतीत वेगळाच प्रकार समोर आला आहे. महिलांच्या प्रमाणपत्रावर पुरुष असल्याचे दाखविण्यात आले. काहींनी दुसरा डोस घेऊनही त्यांना पहिला डोस घेतल्याचेच प्रमाणपत्र पुन्हा आले. प्रामुख्याने या चुका प्रमाणपत्रावर दिसून येत आहेत.