बेंबळात ‘अमृत’च्या गटांगळ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 10:31 PM2018-10-31T22:31:21+5:302018-10-31T22:32:07+5:30

उन्हाळ्यात यवतमाळकरांना पाणी पाजण्याच्या नादात ३०२ कोटींची ‘अमृत’ योजना फसली. चाचणीतच चार ठिकाणी पाईपच्या ठिकऱ्या उडाल्या. आता नवीन पाईप टाकण्याचेही वांदे सुरू आहे.

Amber's group | बेंबळात ‘अमृत’च्या गटांगळ्या

बेंबळात ‘अमृत’च्या गटांगळ्या

Next
ठळक मुद्देजलशुध्दीकरण केंद्राचे काम ३० टक्केच

विलास गावंडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उन्हाळ्यात यवतमाळकरांना पाणी पाजण्याच्या नादात ३०२ कोटींची ‘अमृत’ योजना फसली. चाचणीतच चार ठिकाणी पाईपच्या ठिकऱ्या उडाल्या. आता नवीन पाईप टाकण्याचेही वांदे सुरू आहे. आॅक्टोबर २०१९ पर्यंत योजनेचे काम पूर्ण करून यवतमाळकरांना बेंबळा प्रकल्पाचे पाणी पाजण्याचे मोठे आव्हान महाराष्ट्र जीवन प्राधिकरणापुढे आहे. कामाची सध्याची गती पाहता नियोजित वेळेत पाणी मिळण्याची शक्यता कमीच आहे.
यवतमाळ शहराचा पसारा वाढला. निळोणा आणि चापडोह प्रकल्प भविष्यात शहराची तहान भागवू शकणार नाही. शिवाय बेंबळाचे पाणी आणल्यास नळाला २४ तास पाणी देता येईल, या दृष्टिकोनातून बेंबळाला चालना देण्यात आली. ३०२ कोटी रुपयांची ‘अमृत’ योजना हाती घेण्यात आली. २९ एप्रिल २०१७ रोजी कार्यारंभ झाला. शहरात लहान-मोठ्या पाईपलाईन टाकण्याची कामे सुरू झाली. टाक्या उभ्या होत गेल्या. बेंबळापासून २६ किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचेही काम सुरू झाले. मात्र २०१८ चा उन्हाळा या योजनेची परीक्षा घेणारा ठरला.
बेंबळावरून एक हजार मीमी व्यासाची पाईप लाईन टाकण्याच्या कामाला झपाट्याने सुरूवात करण्यात आली. जॅकवेलवर ५०० ते १५०० हॉर्सपॉवरच्या मोटर लावण्यात आल्या. दिवसरात्र काम करून टाकळी जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाईप टाकली गेली. या केंद्राच्या टाक्यात पाणी घेण्यासाठी बेंबळा ते टाकळीपर्यंत हायड्रोलीक सिस्टीमने मुंबईतील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पाईपची चाचणी घेण्यात आली. मात्र पहिल्याच प्रयत्नात भिसनी गावाजवळ जॅकवेलपासून काही अंतरावर पाईपच्या ठिकºया उडाल्या. यानंतर चार ठिकाणी पाईप फुटले अन् पाईप पुरवठ्यातील निकृष्ठतेचा भंडाफोड झाला. त्यासोबतच उन्हाळ्यात यवतमाळकरांना बेंबळाचे पाणी पाजण्याचे पालकमंत्री मदन येरावार यांचे स्वप्न भंगले.
नवीन पाईप टाकण्याचे फर्मान जीवन प्राधिकरणाच्या गुणनियंत्रण अधिकाऱ्यांनी सोडले. कंपनीने नवीन पाईप द्यावे, अन्यथा पोलीस कारवाई केली जाईल, असा दम भरला गेला. अखेर कंपनीने ३० कोटींचे पाईप बदलवून देण्याची तयारी दर्शविली. पाईप टाकण्याच्या खर्चाचा भारही कंपनी उचलणार आहे. दोन महिन्यांपूर्वी नवीन पाईप दाखल झाले. टाकळीपासून पाईप टाकणे सुरू झाले. एक ते दीड महिन्यात केवळ ४०० मीटर पाईप टाकण्यात आले. आता मजूर पुरविणाऱ्या कंपनीने हे काम थांबविले आहे. १८ किलोमीटर पाईप टाकायचे आहे. बहुतांश भाग शेतातून गेला आहे. शेतात पिके उभी आहेत. अशावेळी हे काम पुढे सरकरणार नाही, हे निश्चित आहे. शिवाय यापूर्वी झालेल्या कामामुळे शेतकºयांचे नुकसान झाले. आता त्यांचा काय पवित्रा राहील, हे पाहणे महत्वाचे ठरते.
गतवर्षी लोकप्रतिनिधींनी योजनेचे प्रत्यक्ष काम करणाऱ्यांच्या पुढे जाऊन पाणी देण्याच्या घोषणा केल्या होत्या, हे विशेष. आता पाईप लाईनचे काम पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. सदर योजनेचे सर्व काम आॅक्टोबर २०१९ पर्यंत पूर्ण करायचे आहे. जुने १८ किलोमीटर पाईप टाकण्यासाठीच पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागला होता. आता जुने काढणे, नवीन पाईप बोलावून बसविणे या कामात अधिक वेळ जाणार आहे. सध्याची स्थिती पाहता निर्धारित कालावधीत काम पूर्ण होण्याविषयी साशंकता आहे.
निकृष्ट पाईपचा भार ‘मजीप्रा’वर
निकृष्ट पाईप पुरविल्याने प्रकरण पोलिसात नेण्याची तयारी सुरू होती. मात्र नवीन पाईप देण्याचे कंपनीने मान्य केल्याने ही कारवाई थांबविली गेल्याचे सांगितले जाते. कंपनीने नवीन पाईप देऊन टाकण्याची जबाबदारी उचलली. मात्र या कामावर नियंत्रण, प्रत्यक्ष भेटी, लागणारे मनुष्यबळ यासाठी ‘मजीप्रा’वर भार पडणार आहे. याची भरपाई कोण देणार, हा प्रश्न आहे.
टाकळी ते वेअर हाऊस यशस्वी
टाकळी जलशुध्दीकरण केंद्र ते गोधणी रोडची टाकी, अशी ८०० मीमीची पाईप लाईन टाकण्यात आली. ही सर्व लाईन शहरातून गेली. त्याची हायड्रोलीक चाचणी झाली. टाकळी ते धामणगाव रोडवरील वेअरहाऊसपर्यंत चे पाईप ‘स्ट्राँग’ निघाल्याने प्राधिकरण आणि कंत्राटदाराने सुटकेचा सुस्कारा सोडला. पुढील पाईप लाईनही ‘स्ट्राँग’च निघेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
१८ किमी पाईपलाईननंतर शुद्धीकरण केंद्राची उपयोगिता
बेंबळाचे जलशुध्दीकरण केंद्र टाकळी येथे होत आहे. याचे काम ३० टक्के पूर्ण झाले आहे. शहराच्या विविध भागातील नवीन टाक्यांचे काम काही महिन्यात पूर्ण होईल. मात्र १८ किलोमीटर पाईप लाईन पूर्ण झाल्यानंतरच हे केंद्र उपयोगात येणार आहे.
यवतमाळकर साशंक
जीवन प्राधिकरणाचे अभियंता आॅक्टोबर २०१९ ला योजना पूर्ण होणार असा दावा करीत असले तरी प्राधिकरणाने या योजनेबाबत गेल्या उन्हाळ्यात दिलेल्या विविध तारखा पाहता त्यांच्या दाव्याकडे आतापासूनच साशंकतेने पाहिले जात आहे.

Web Title: Amber's group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.