रुग्णवाहिका संपाचा रुग्णांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:01 AM2019-02-10T00:01:30+5:302019-02-10T00:02:31+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून रूग्णवाहिकांना हटविण्यात आले. या विरोधात रूग्णवाहिका चालकांनी संप पुकारला आहे. त्याचा फटका रूग्णांना बसला. मयत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना शव हलविता आले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून रूग्णवाहिकांना हटविण्यात आले. या विरोधात रूग्णवाहिका चालकांनी संप पुकारला आहे. त्याचा फटका रूग्णांना बसला. मयत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना शव हलविता आले नाही. तर गंभीर रूग्णाला तासन्तास प्रतीक्षा करावी लागली.
गुरूवारी रुग्णवाहिका चालकांनी पालकमंत्र्यांच्या घरावर धडक दिली होती. यानंतरही ठोस दिलासा मिळाला नाही. यामुळे शनिवारी संप कायम होता. धामणगाव तालुक्यातील गोकुळसरा येथील प्रफुल्ल डोंगरे यांच्या आजी रूग्णालयात भरती होत्या. आजीच्या निधनानंतर शव घरीच नेता आले नाही. शनिवारी आर्णीला अपघात झाला. त्यातील जखमीला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथून त्याला सेवाग्रामला हलवायचे होते. मात्र रूग्णवाहिका नसल्याने नातेवाईकांना प्रचंड त्रास झाला. शेवटी खासगी गाडी करून न्यावे लागले. यामध्ये अतिरिक्त पैसे विष्णू राऊत यांना मोजावे लागले. सचिन पाढेन (रा. मंगरुळपीर) यांच्या वडीलांना किडणीचा आजार असल्याने डायलिसीसकरिता नागपूरला न्यायचे होते. मात्र रूग्णवाहिका मिळाली नाही.
जीव गेल्यावर तोडगा निघणार काय?
रूग्णवाहिका चालकांच्या संपामुळे रूग्णाचे नातेवाईक व्यवस्थानावर संतापले आहे. यासंदर्भात तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. रूग्णाचा जीव गेल्यानंतरच तोडगा निघणार काय, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.