अमेरिकेच्या प्राध्यापकांनी गाठले थेट यवतमाळ जिल्ह्यातील दहागावचे शेतशिवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2022 07:30 AM2022-03-03T07:30:00+5:302022-03-03T07:30:03+5:30

Yawatmal News अमेरिकेतील ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीमधील दोन प्राध्यापकांनी थेट तालुक्यातील दहागाव येथील शेतशिवार गाठून बाबाराव जाधव या शेतकऱ्याची भेट घेवून सेंद्रिय शेतीची माहिती घेतली.

American professors reached Dahagaon farm in Yavatmal district directly | अमेरिकेच्या प्राध्यापकांनी गाठले थेट यवतमाळ जिल्ह्यातील दहागावचे शेतशिवार

अमेरिकेच्या प्राध्यापकांनी गाठले थेट यवतमाळ जिल्ह्यातील दहागावचे शेतशिवार

Next
ठळक मुद्देशेतकरी जाधव यांच्याकडून घेतली सेंद्रिय शेतीची माहिती

अविनाश खंदारे

यवतमाळ : रासायनिक शेतीच्या दुष्परीणामामुळे सेंद्रिय शेतीकडे जग मोठ्या आशेने पहात असतानाच अमेरिकेतील ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीमधील दोन प्राध्यापकांनी थेट तालुक्यातील दहागाव येथील शेतशिवार गाठून बाबाराव जाधव या शेतकऱ्याची भेट घेवून सेंद्रिय शेतीची माहिती घेतली. यामुळे सेंद्रिय शेतीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

येथील गो.सी. गावंडे महाविद्यालयात अमेरिकेच्या ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीतील प्रा.डॉ. श्रीमती बेट्सी व डॉ. ब्रिजू टॅक्चन अभ्यास दौऱ्यावर आले आहे. त्यांनी २७ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील दहागाव येथे भेट दिली. तेथे महाराष्ट्र शासनाचा सेंद्रिय शेती कृषिभूषण पुरस्कार प्राप्त केवळ दहावीपर्यंत शिकलेले शेतकरी बाबाराव जाधव (७६) यांची भेट घेतली. दोन्ही प्राध्यापकांनी जाधव यांच्या सेंद्रिय शेतीची पाहणी केली. नंतर त्यांच्याकडून सेंद्रिय शेती नियोजनाची सखोल माहिती जाणून घेतली.

उमरखेड तालुक्यातील दहागाव येथील शेतकरी बाबाराव उत्तमराव जाधव यांनी सेंद्रिय शेतीतून विक्रमी उत्पादन घेत शेती व्यवसायातून आर्थिक प्रगती साधली आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना २०१० मध्ये महाराष्ट्र शासनाने कृषिभूषण पुरस्कार, हैद्राबाद येथील स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशनने फेलोशिप, २०१३ मध्ये गुजरात सरकारने उत्कृष्ट सेंद्रिय शेती पुरस्कार देऊन गौरविले आहे. जाधव यांना देश पातळीवरील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या यशोगाथेची माहिती जाणून घेण्यासाठी अमेरिकेतील आहियो स्टेट युनिव्हर्सिटीतील ‘माती, पाणी, आशा’ या उपक्रमाअंतर्गत स्थानिक गो.सी. गावंडे महाविद्यालय येथे अभ्यास दौऱ्यावर आलेले डॉ.प्रा. बेट्सी आणि प्रा.डॉ. ब्रीजू टॅक्चन यांनी त्यांच्या शेतीची पाहणी केली.

मोडकी-ताेडकी इंग्रजी; पण संवाद महत्त्वाचा

शेतकरी बाबाराव जाधव यांचे शिक्षण जेमतेमच. त्यांना धड इंग्रजी येत नाही. मात्र थेट अमेरिकेतील प्राध्यापक शेतात आणि घरी आल्याने ते हरखून गेले. त्यांच्याकडून अर्धवट हिंदी, इंग्रजी भाषेत अमेरिकेच्या प्राध्यापकांनी सेंद्रिय शेतीची इत्यंभूत माहिती जाणून घेतली. विशेष म्हणजे अलीकडेच अर्धांगवायूमुळे आलेल्या अपंगत्वावर मात करणाऱ्या बाबाराव जाधव यांनी उभयतांचे स्वागत करून त्यांना संपूर्ण माहिती दिली.

केवळ सहा एकरावर गुजराण

बाबाराव जाधव यांच्याकडे केवळ सहा एकर वडिलोपार्जित शेती आहे. त्यावरच त्यांच्या कुटुंबाची गुजराण सुरू आहे. त्यांचे सध्याचे वय ७६ वर्षे आहे. शेती कामात त्यांना पत्नी सुलोकताबाई मोलाची मदत करतात. १९६७ मध्ये बाबाराव दहावी उत्तीर्ण झाले. त्यांची दोन्ही मुलेसुध्दा सेंद्रिय शेती करतात. स्वामिनाथन यांनी हैद्राबाद येथे १९९४ मध्ये घेतलेल्या कार्यक्रम व प्रदर्शनीला जाधव उपस्थित होते. तेव्हापासूनच ते गांडूळ खताची निर्मिती व सेंद्रीय शेतीकडे वळले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ, मुंबईची जमशेट टाटा नॅशनल व्हर्चिअल अकॅडमीने त्यांना गौरविले. गुजरात सरकारने तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार दिला होता. कृषी विभागाचे तालुका, जिल्हा, राज्यस्तरीय अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

Web Title: American professors reached Dahagaon farm in Yavatmal district directly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती