एमपीडीए कायद्यांतर्गत अमित यादव स्थानबद्ध; जिल्हा कारागृहात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 06:58 PM2019-08-21T18:58:22+5:302019-08-21T18:58:34+5:30
जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यानुसार (एमपीडीए) स्थानबद्ध करण्यात आले
यवतमाळ: लोहारा पोलीस स्टेशन हद्दीतील कुख्यात गुंड अमित राजकुमार यादव (28 वर्ष) याला जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यानुसार (एमपीडीए) स्थानबद्ध करण्यात आले असून, त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.
अमित यादव हा सन 2009 पासून नियमितपणे खून, घातक शस्त्रे वापरून खुनाच्या प्रयत्नासह दंगा, दुखापत, विनयभंग, जबरी चोरी, बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणे अशा प्रकारे शरीराविरुद्ध, मालमत्तेविषयक गंभीर गुन्हे सातत्याने करीत होता. त्यामुळे लोहारा परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षितेतची भावना निर्माण झाली होती. परिणामी सार्वजनिक सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत होता. त्याच्याविरुद्ध आजपर्यंत केलेल्या प्रतिबंधक कार्यवाहीचा कुठलाही परिणाम होत नसल्यामुळे अमित यादव विरुद्ध लोहारा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांनी धोकादायक व्यक्ती या सदराखाली जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केला.
जिल्हा दंडाधिकारी यांनी या प्रस्तावाच्या आधारे गुंड अमित यादवला स्थानबद्ध करण्याचे आदेश निर्गमित केल्याने त्याला 21 ऑगस्ट रोजी ताब्यात घेऊन यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती कारागृहात येथे महाराष्ट्र झोपडपट्टी दादा कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप शिरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लुले, सहाय्यक फौजदार नरेंद्र मानकर, आशिष भुसारी यांनी पार पाडली.