रक्कम घेतली पण प्लॉट दिला नाही; ग्राहक मंचाने बांधकाम व्यावसायिकाला ठोठावला दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2022 01:26 PM2022-07-23T13:26:15+5:302022-07-23T13:33:31+5:30
पांढरकवडा येथील नागरिकाने याप्रकरणी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.
यवतमाळ : करारानुसार रक्कम घेऊनही प्लॉटची खरेदी करून न दिल्याने यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने वर्धा येथील बांधकाम व्यावसायिकाला दंड ठोठावला आहे. पांढरकवडा येथील नागरिकाने याप्रकरणी आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. सतीश विलासराव नरहरशेट्टीवार असे या बांधकाम व्यावसायिकाचे नाव असून त्याने राळेगाव (जि. यवतमाळ) येथे गजानन नगरी नावाने ले-आऊट टाकले आहे.
या लेआऊटमध्ये सच्चिदानंद माधवराव कुंभारे यांनी प्लॉटसाठी नोंदणी केली. यानंतर ठरल्यानुसार नरहरशेट्टीवार यांच्याकडे त्यांनी रकमेचा भरणाही केला. तीन लाख ५१ हजार ४५ रुपयांत प्लॉटचा करार करण्यात आला. ही रक्कम टप्प्याटप्प्याने भरायची होती. सच्चिदानंद कुंभारे यांनी दोन लाख ६० हजार ४१७ रुपये भरले. मात्र, मुदत संपल्यानंतरही सतीश नरहरशेट्टीवार यांनी प्लॉटची खरेदी करून दिली नाही. तसेच वारंवार सांगूनही टाळाटाळ केली. त्यामुळे सच्चिदानंद कुंभारे यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेतली. आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार वाघमारे, सदस्य हेमराज ठाकूर यांच्या उपस्थितीत या तक्रारीवर सुनावणी झाली.
सतीश नरहरशेट्टीवार यांना आयोगाने नोटीस बजावल्यानंतरही ते आयोगासमोर हजर झाले नाहीत. त्यामुळे हे प्रकरण एकतर्फी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. कुंभारे यांच्या तक्रारीवरील सुनावणीदरम्यान ले-आऊटची जागा अकृषक आहे की नाही, हेसुद्धा स्पष्ट होऊ शकले नाही. अखेर आयोगाने या तक्रारीवर एकतर्फी निर्णय दिला आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकाने प्लॉट विकण्यासाठी भेट योजनाही जाहीर केली होती.
भरलेली रक्कम १२ टक्के व्याजाने द्यावी
सच्चिदानंद कुंभारे यांनी भरलेली दोन लाख ६० हजार ४१७ रुपये रक्कम १२ टक्के व्याजासह द्यावी, शारीरिक व मानसिक त्रासापोटी पाच हजार रुपये तसेच नुकसानभरपाई आणि तक्रारीचा खर्च म्हणून तीन हजार रुपये द्यावेत, असा आदेश आयोगाने सतीश नरहरशेट्टीवार यांना दिला आहे.