हत्तीपाय रुग्णांना मिळणार दिव्यांग प्रमाणपत्राचा आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 05:57 PM2024-07-02T17:57:46+5:302024-07-02T17:58:32+5:30
जिल्ह्यात ५९३ रुग्णांची नोंद: सामाजिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आजार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : हत्तीरोग हा डास चावल्याने जंतू संसर्गामुळे होतो. दुर्लक्षित असलेल्या या आजाराच्या ठराविक वृद्धीनंतर रुग्णांच्या हालचालीवर कमालीची बंधने येतात. यामुळे ते मुक्तपणे फिरू शकत नाहीत. अशा रुग्णांना आधार देण्यासाठी हत्तीरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत दिव्यांगप्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ५९३ हत्तीरोग रुग्णांना प्रमाणपत्र मिळाल्यावर शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.
राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ५९३ रुग्णांची नोंद करण्यात आले. सर्वाधिक रुग्ण वणी, मारेगाव, झरी, पांढरकवडा, राळेगाव, घाटंजी, कळंब व बाभूळगाव या तालुक्यात आहेत. हत्तीरोग हा सामाजिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आजार आहे. रुग्णाच्या पायावर सूज येऊन हालचालीवर निर्बंध येतात. इतरांच्या मदतीशिवाय रुग्ण हालचाल करू शकत नाही. पायाच्या सुजेची तीव्रता तपासून दिव्यांग प्रमाणपत्र वितरित करण्याचे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तांनी दिले आहेत. डॉक्टरांकडून तपासणी झाल्यावर त्यांना सेतू सुविधा केंद्रातून लाभार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज भरायचे आहेत. यासाठी दोन पासपोर्ट, आधारकार्डसह मोबाइल क्रमांक देणे बंधनकारक राहणार आहे.
'क्युलेक्स' डासापासून सावधान
'क्युलेक्स' प्रजातीच्या डासांपासून हत्तीरोग पसरतो. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार 'क्युलेक्स' डास हत्तीरोगास कारणीभूत 'बुचेरीया बॅनक्रॉष्टिया' या परजिवी जंतुच्यामुळे प्रसार होतो. हा परजीवी वाहक डास चावल्यानंतर हत्तीरोगाचे जंतू माणसाच्या शरीरात सोडतो. हे जंतू चावलेल्या ठिकाणाहून किंवा अन्य ठिकाणाहून त्वचेतून शरीरात प्रवेश करतात. जंतूने आत प्रवेश केल्यावर लक्षणे दिसून येण्यासाठी ८ ते १६ महिन्यांचा कालावधी लागतो.
काय आहेत लक्षणे?
वाहक अवस्थेत रुग्णाच्या घेतलेल्या रक्त नमुन्यात 'मायक्रोफायलेरिया आढळून येतात. परंतु यात कोणत्याही प्रकारची लक्षणे दिसत नाही. तीव्र अवस्थेत ताप येणे, लसिकाग्रंथींचा दाह सुरु होतो. लसिकाग्रंथींना सूज येते. पुरुषांमध्ये वृषणदाह सुरू होतो. दीर्घकालीन संसर्गावस्थेत हात, पाय आणि बाह्य जननेंद्रियामध्ये सूज येते, अशी लक्षणे दिसून येतात.
हत्तीपाय रुग्णांची अध्यक्ष (अपंग मंडळ) वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात तपासणी करून दिव्यांगांचे प्रमाणपत्र वितरित होत आहे. तपासणीसाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. त्यांना आणण्यासाठी नियोजन केले आहे.
- डॉ. टी. ए. शेख, जिल्हा हिवताप अधिकारी