अमरावती ४६ टक्के तर नागपूर विभागात ३७.५९ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 11:24 AM2021-07-30T11:24:58+5:302021-07-30T11:25:28+5:30
Yawatmal News गुरुवारी सकाळपर्यंत अमरावती विभागातील ४४६ प्रकल्पात ४६.७२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सध्या यवतमाळसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत असला तरी पाणीसाठ्याच्या दृष्टीने विदर्भाला आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. गुरुवारी सकाळपर्यंत अमरावती विभागातील ४४६ प्रकल्पात ४६.७२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता. मागील वर्षी याच तारखेपर्यंत तो ४५.३४ टक्के होता. तर नागपूर विभागातील ३८४ धरणांमध्ये ३७.५९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मागील वर्षी याच प्रकल्पात ५०.१४ टक्के पाणी उपलब्ध झाले होते. राज्यातील पाणीसाठ्याची उपलब्धता पाहता त्या तुलनेत अमरावती आणि नागपूर विभागात आणखी मोठ्या पावसाची गरज आहे. यंदा जून महिन्यापासूनच पावसाने सर्वदूर हजेरी लावली. राज्यात सर्व प्रकारचे मिळून एकूण तीन हजार २६७ प्रकल्प आहेत. या प्रकल्पात गुरुवारी सकाळपर्यंत ५०.०२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो साधारण १० टक्क्याने अधिक असला तरी राज्यातील उपलब्ध पाणीसाठ्याच्या तुलनेत अमरावती आणि नागपूर विभागातील पाणीसाठा अद्यापही कमी असल्याचे दिसते.
अमरावती विभागात दहा मोठे प्रकल्प आहेत. यात ५९.७७ टक्के पाणी उपलब्ध झाले आहे. तर नागपूर विभागातील १६ मोठ्या प्रकल्पात ४५.०१ टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे. राज्यातील मोठ्या प्रकल्पांची आकडेवारी पाहिली असता एकूण १४१ प्रकल्पात ६०.७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. काहीशी अशी स्थिती मध्यम प्रकल्पांच्या बाबतीत आहे. अमरावती विभागातील २५ मध्यम प्रकल्पात ४४.६९ टक्के पाणी उपलब्ध झाले आहे. मागील वर्षी ते ४४.६७ टक्के इतके होते. नागपूर विभागातील ४२ मध्यम प्रकल्पात १७.६९ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो साधारण निम्मा आहे. मागील वर्षी याच प्रकल्पात ३४.१६ टक्के पाणी उपलब्ध होते. या विभागातील लघु प्रकल्पांची स्थिती पाहिली असता अमरावतीअंतर्गतच्या ४११ प्रकल्पात १६.८७ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तर नागपूर विभागातील ३२६ लघु प्रकल्पात ११.३४ टक्के पाणीसाठ्याची उपलब्धता आहे. मागील वर्षी याच प्रकल्पात दुप्पटीहून म्हणजे ३१.७६ टक्के पाणी उपलब्ध होते.