भरधाव वाहनाने वृद्ध दाम्पत्याला चिरडले; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2022 04:53 PM2022-04-25T16:53:37+5:302022-04-25T17:38:54+5:30

अपघातानंतर ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला. उशिरापर्यंत रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.

An elderly couple was crushed by a speeding vehicle | भरधाव वाहनाने वृद्ध दाम्पत्याला चिरडले; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

भरधाव वाहनाने वृद्ध दाम्पत्याला चिरडले; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

Next
ठळक मुद्देभारी फाट्यावरील थरार

यवतमाळ : येथील नागपूर मार्गावरील भारी फाट्यावर पायदळ जात असलेल्या वृद्ध दाम्पत्याला अज्ञात वाहनाने चिरडले. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या फाट्यावर वाहतूक सुरक्षेची कुठलीही सुविधा नाही. त्यामुळे सुसाट जाणारी वाहने जीवघेणी ठरत आहेत. ही घटना रविवारी रात्री घडली. अपघातानंतर ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला. उशिरापर्यंत रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.

भुतू नागोराव येलकर (५५), सरस्वती भुतू येलकर (५०), दोघे रा. जवाहरनगर मुरझडी अशी मृतांची नावे आहेत. ते भारी फाट्यावर रस्ता ओलांडत असताना अज्ञात पांढऱ्या रंगाच्या वाहनाने दोघांनाही चिरडले व ते वाहन पसार झाले. क्षणातच दोघांचाही जागेवर मृत्यू झाला. ही माहिती गावात पोहोचताच गावकरी रस्त्यावर उतरले. प्रशासनाच्या नावाने गावकरी निदर्शने करू लागली.

रस्त्यावर ग्रामस्थ उभे ठाकल्याने महामार्गाची वाहतूक थांबली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने उपविभागीय अधिकारी संपतराव भोसले, तहसीलदार कुणाल झाल्टे घटनास्थळी पोहोचले. यावेळी ग्रामस्थांच्या रोषाला अधिकाऱ्यांना सामोरे जावे लागले. भारी फाट्यावर सुरक्षेची कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. या ठिकाणी किमान हायमास्ट लाइट लावला जावा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली. बराच वेळ नोकझोक चालल्यानंतर अधिकारी वर्ग ग्रामस्थांची समजूत काढण्यात यशस्वी झाला. दोघांचेही प्रेत शवचिकित्सेसाठी हलविण्यात आले व नंतर ग्रामस्थ रस्त्यावरून बाजूला झाले.

रात्री उशिरा खोळंबलेली वाहतूक पूर्ववत झाली. याप्रकरणी रवींद्र रामचंद्र गोदनकर, रा. घोरखिंडी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास यवतमाळ शहर पोलीस करीत आहेत.

Web Title: An elderly couple was crushed by a speeding vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.