चक्क २५ एकरात गांजाचे आंतरपीक, ५० पोलिसांनी घातली पहाटे धाड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 03:25 PM2023-10-05T15:25:42+5:302023-10-05T15:40:56+5:30

घोणसरा-बरगेवाडी शिवारात १५ क्विंटलपेक्षा अधिक गांजा जप्त

An intercropping of 25 acres of cannabis, 50 police raided in the early morning | चक्क २५ एकरात गांजाचे आंतरपीक, ५० पोलिसांनी घातली पहाटे धाड

चक्क २५ एकरात गांजाचे आंतरपीक, ५० पोलिसांनी घातली पहाटे धाड

googlenewsNext

महागाव/पुसद (यवतमाळ) : महागाव तालुक्यातील घोणसरा आणि बरगेवाडी या दुर्गम गावाच्या शिवारात चक्क गांजाची शेती करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल २५ एकर क्षेत्रात इतर पिकांमध्ये आंतरपीकासारखी गांजाची लागवड करण्यात आली. सुगावा लागल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी पहाटे ४:०० वाजता धाड टाकून शिवाराची झाडाझडती घेतली.

५० पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा समावेश असलेले पथक शिवारात धडकले. त्यांनी झाडाझडती घेतली असता एक-दोन नव्हे तर तब्बल २५ पेक्षा अधिक एकरात आंतरपिकासारखी गांजाची लागवड करण्यात आल्याचे पाहून पोलिसही हादरून गेले. काळी (दौ.) सर्कलमधील घोणसरा शिवारात छुप्या पद्धतीने गांजाची लागवड करण्यात येत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेची यंत्रणाही चक्रावली होती. गांजाच्या शेतीची माहिती घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून एका आठवड्यापासून गोपनीय पद्धतीने सुगावा घेण्यात येत होता.

एलसीबीचे एक-दोन कर्मचारी वेशांतर करून घोणसरा व बरगेवाडी शिवारात माहिती घेण्यासाठी फिरत होते. ग्राहक बनून काही लोकांकडून गांजाच्या शेतीची तपशीलवार माहिती त्यांनी गोळा केली. अहवाल पोलिस अधीक्षकांना दिला. नंतर बुधवारी पहाटे मोठ्या प्रमाणात धाडसत्र राबविण्यात आले. पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड याच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आधारसिंह सोनुने व ५० कर्मचाऱ्यांचा फौजफाटा मंगळवारी रात्रीच पुसद ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला. पुसद शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल सांगळे, गजानन गजभारे, गणेश वनोरे, विवेक देशमुख, ग्रामीणचे ठाणेदार आर.के. राठोड, सहायक पोलिस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू आणि यंत्रणेला सोबत घेऊन बुधवारी पहाटे ४:०० वाजताच्या सुमारास हा लवाजमा घोणसरा येथे धडकला.

घोणसरा येथील गांजा लागवड करणाऱ्या संशयितांना पोलिसांनी आधी ताब्यात घेतले. नंतर विचारपूस करून दुर्गम भागातील शिवारात शोधमोहीम हाती घेतली. घटनास्थळावरील प्रत्यक्ष गांजाची लागवड पाहून पोलिसांचे डोळेही विस्फारले. तब्बल २५ एकरात ठराविक अंतरावर कापूस आणि सोयाबीन पिकांमध्ये गांजाची लागवड करण्यात आल्याचे पाहून पोलिसांना धक्का बसला. नेमक्या किती एकर क्षेत्रावर गांजाची लागवड करण्यात आली, याचा तपास करण्यासाठी शोधमोहीम राबविण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत १५ क्विंटलपेक्षा जास्त गांजाची झाडे कापून पोलिसांनी ताब्यात घेतली. अजूनही काही शेतांमध्ये गांजाची लागवड केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून शोधमोहीम सुरूच आहे.

चार शेतकरी ताब्यात

गांजाची लागवड करणारे चार संशयित शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. देविदास ढाकरे, सुखदेव ढाकरे, वनदेव ढाकरे (सर्व रा. घोणसरा) आणि फुलसिंग राठोड (रा. मोहदी) अशी शेतकऱ्यांची नावे आहेत. घोणसरा, बरगेवाडी आणि काही गावात मागील पाच वर्षांपासून छुप्या पद्धतीने गांजाची शेती करण्यात येत होती, असे चौकशीत उघड झाल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांनी सांगितले. ते स्वतः घोणसरा शिवारात दाखल झाले होते. किमान तीन किलोमीटर अंतर पायी चालत त्यांनी पोलिसांना सूचना दिल्या. पुढील काही दिवस शोधमोहीम सुरूच राहील, अशी माहिती डॉ. पवन बनसोड यांनी दिली.

गांजाचे लातूर-मुंबई कनेक्शन

घोणसरा-बरगेवाडी शिवारात पिकविण्यात येत असलेल्या गांजाचे थेट लातूर आणि मुंबई येथे कनेक्शन असल्याचे कळते. लातूर येथे हॉटेल व्यवसाय करणारा एक व्यक्ती गांजाची खेप घेऊन जात असल्याची चर्चा गावात होत आहे. याशिवाय मुंबई येथून काही घाऊक खरेदीदार घोणसरा येथे गांजा खरेदीसाठी येत असल्याची कुजबुजही गावकऱ्यांमध्ये सुरू आहे.

Web Title: An intercropping of 25 acres of cannabis, 50 police raided in the early morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.