धावत्या बसला लोंबकळलेला वृद्ध खाली कोसळला, हात-पाय फ्रॅक्चर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 02:29 PM2023-01-12T14:29:35+5:302023-01-12T14:31:27+5:30
मारेगावातील घटना
मारेगाव (यवतमाळ) : थांब्यावर बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना अचानक बस सुरू झाली. त्यामुळे वाहकाजवळील खिडकीच्या दांड्याला धरून ८० वर्षीय वृद्ध धावत्या बसला लोंबकळत असल्याचे पाहून आरडाओरडा झाला. यानंतर काही अंतरावर बस थांबताच वृद्ध खाली कोसळल्याने त्याचा हात व पाय फ्रॅक्चर झाला. हा थरार बुधवारी अडीच वाजताच्या सुमारास येथील बसथांब्यावर घडला.
नीलकंठ पैकाजी बद्दलवार असे जखमी वृद्धाचे नाव असून, ते मारेगाव तालुक्यातील हिवरा-मजरा येथील रहिवासी आहेत. कामानिमित्त ते मारेगाव येथे आले होते. आपले काम आटोपून गावाकडे परत जाण्यासाठी ते बस क्रमांक (एमएच ४०, वाय ५८३१) या यवतमाळ - गडचिरोली बसमध्ये चढत असताना अचानक बस सुरू झाली.
या गडबडीत त्यांच्या हाताला वाहकाजवळील खिडकीचा दांडा लागला. त्या दांड्याला लोंबकळतच ते ५०० फूट दूर गेले. मात्र, याकडे चालक-वाहकाचे लक्ष नव्हते. यावेळी धावत्या बसला लोंबकळत असलेला वृद्ध पाहून आरडाओरडा सुरू झाला. यानंतर चालकाने बस थांबविण्यासाठी ब्रेक मारल्याबरोबर नीलकंठ बद्दलवार हे खाली कोसळले. यात त्यांच्या हात व पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यांना उपचारासाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बरेचदा प्रवाशांची गर्दी वाढली की, अशा घटना नेहमीच घडतात. वाहक निर्दयीपणे बसचे दार बंद करून बस सुरू करतात व यातून असे प्रकार घडतात. पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहेत.