यवतमाळ जिल्ह्यात प्रदूषणामुळे ५० हजार लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 10:45 AM2017-12-22T10:45:32+5:302017-12-22T10:52:12+5:30
गेल्या १० ते १२ वर्षांपासून तालुक्यात प्रदूषणाने कहर केला आहे. दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत असल्याने तालुक्यातील ५० हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : गेल्या १० ते १२ वर्षांपासून तालुक्यात प्रदूषणाने कहर केला आहे. दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत असल्याने तालुक्यातील ५० हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यातील महागाव, सवना, गुंज, फुलसावंगी, काळी दौ. आदी ठिकाणी हमरस्त्यावर विटांच्या भट्टयांमधून निघणारा धूर नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक ठरत आहे. प्रदूषण विभागाचे अधिकारी मात्र हातावर हात देऊन बसले आहेत. तालुक्यात या भट्ट्यांना मिळणारे पाठबळ आणि त्या भरवशावर कोट्यवधी रुपयांच्या अलिखित आर्थिक उलाढालीत अनेक जण हिस्सेदार बनल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गुंज येथे कारखान्यातून निघणारा धूर आणि विट्टा भट्टयांच्या प्रदूषणामुळे अनेकांना डोळ्यांचे आजार, दमा, कफ आणि हाडांच्या ठिसूळतेचा सामना करावा लागत आहे. या प्रदूषणाने सुमारे दोन हजार नागरिक नरक यातना भोगत आहेत. दोन्ही कारखान्यांच्या चिमणीतून निघणारा धूर आणि प्रदूषणाने जनतचे आरोग्य धोक्यात आले आहे.
प्रदूषण नियंत्रण अधिकारी फिरकलेच नाही
प्रदूषण विभागाने सहस्त्रकुंड जल विद्युत प्रकल्पाची महागाव येथे जनसुनावणी घेतली होती. त्यानंतर या विभागाचे अधिकारी इकडे कधी फिरकलेच नाही. परिणामी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात सुमारे ७०० विटभट्ट्या नागरिकांसाठी डोकदुखी ठरल्या आहेत.