वºहाडी बोली कविसंमेलन : हसता-हसता केले रसिकांना अंतर्मुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 09:38 PM2019-01-13T21:38:41+5:302019-01-13T21:39:03+5:30
रूपेश उत्तरवार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) : पिलू ठेवून खोप्यात चिऊ हिंडते चाऱ्याले गोठ्यामंदे काळी ...
रूपेश उत्तरवार
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी) :
पिलू ठेवून खोप्यात
चिऊ हिंडते चाऱ्याले
गोठ्यामंदे काळी गाय
कशी चारे वासराले
हे पाहून वाटते
माय असावी साऱ्याले
कवी जयंत चावरे यांनी सादर केलेली ‘माय’ कविता वऱ्हाडी बोली कविसंमेलनात सर्वाधिक भाव खाऊन गेली. चावरे यांनी आपल्या स्वरात ही कविता सादर केली. या कवितेने अनेकांच्या डोळ्यांना धारा लागल्या. माय म्हणजे काय, मायचे महती जयंत चावरे यांनी वऱ्हाडी बोलीतून मांडली.
शायर भाऊसाहेब पाटणकर परिसर, प्राचार्य राम शेवाळकर व्यासपीठावर शनिवारी सायंकाळी वऱ्हाडी बोली कविसंमेलन झाले. यावेळी नवोदित आणि गाजलेल्या कवींच्या कविता सादर करण्यात आल्या. शेतकरी, गावाकडच्या जुन्या परंपरा, आई, देश, कपाशी, भाऊबंदकी, कष्टकरी आणि वैदर्भीय माणूस यासारख्या अनेक विषयांना कवितेतून हात घातला.
तुह्यं तू पाय मी माह्यावालं पायतो,
आता तू काड्या कर तुले उभ्यानंच जायतो,
रोज कोरू कोरू लेका लंबा केला धुरा,
बोलत नाही म्हणून फायदा घेतं पुरा,
जेवढी हाय जमीन तेव्हडी इमानदारीनं वायतो,
आता तू काड्या कर तुले उभ्यानंच जायतो
भाऊबंदकीचा व्यवहार सांगणारी ही कविता आठमुर्डीतील नीलेश तुरके या नवोदित कवीने सादर करताच हास्यकल्लोळ उडाला.
गेले जमाने आंबे, चिचाचे
बोरीच्या खाली बोरं वेचाचे
कवा हुरडा तोंडाले पाणी
भोंग्याले वाजे लग्नाचं गाणं
मांडवासाठी भोकराचे पानं
शेनाच गोंदन पुरनाची पोळी
या नितीन देशमुखांच्या कवितेने ग्रामीण भागातील जीवन कसे बदलत चालले आहे याचे वर्णन केले. अनेकांना पूर्वीच्या काळातील इतिहासात नेण्याचे काम या कवितेने केले. ‘वान्नेरतोंडे’ या राजा धर्माधिकारी यांच्या कवितेने पाकिस्तानला उघडे पाडण्याचे काम केले.
काय कामाच्या पार्ट्या,
काय कामाचे पक्ष
देश पेटला तरी
खुर्च्याकडेच लक्ष
कुनी दाखवते नेहरू
कुनी दाखवते गांधी,
दाखवते केसर आणि
हाती देते गेरू
या कवितेमधून पाकिस्तानी कारवाया आणि त्याचा उद्रेक मांडण्याचा प्रयत्न केला. या कवितेला ‘वन्स मोअर’ मिळाला. पुसदचे दीपक आसेगावकर यांनी कापूस आणि सरकीच्या रूपात बहरणारे अजरामर प्रेम ही कविता सादर केली.
यावेळी सुरेश गांजरे, राजा धर्माधिकारी, आशा आसुटकर, रमेश घोडे, विष्णू सोळंके, अलका तालणकर, सुनिता पखाले, बसवेश्वर माहूलकर, राजेश देवाळकर, विजय ढाले, डॉ. मार्तंड खुपसे, आंबादास घुले, ऋतू खापर्डे, डॉ. गिरीष खारकर यांच्याही कविता गाजल्या. कविसंमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. शांतरक्षित गावंडे आणि डॉ. स्वप्नील मानकर यांनी केले.
मिर्झांच्या कवितेने हास्यकल्लोळ
मिर्झा रफी अहेमद बेग यांनी सादर केलेल्या कवितेने माहोल केला. ‘शेतकऱ्यांनो आता घेवू नका फाशी’ ही कविता त्यांनी सादर केली. ‘शेतकऱ्यांवर प्रसंग फुटाने फाकाचे, अमीताब घालतो ३ लाखाचा गॉगल’ अशी गमतीदार रचना सादर करून त्यांनी अनेकांना विचार करण्यास भाग पाडले. याचवेळी माय मराठीचे गुणगान सांगणारी कविताही सादर केली. तर मिरा ठाकरे यांनी आपल्या अध्यक्षीय कवितेमध्ये ‘असा वऱ्हाडी माणूस, कुदळ पावडे त्याचा साज’ ही भारदस्त कविता सादर केली.