...अन् चक्क हाताने उकरला रस्ता; रात्रभरात उरकले काम : मेजदा ते वाढोणा मार्गाचे डांबरीकरण
By विलास गावंडे | Updated: June 2, 2024 20:42 IST2024-06-02T20:42:20+5:302024-06-02T20:42:35+5:30
मेजदा ते वाढोणा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. रात्री ११:०० वाजता या कामाला सुरुवात करण्यात आली. सकाळी गावकरी जागे झाल्यानंतर या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली.

...अन् चक्क हाताने उकरला रस्ता; रात्रभरात उरकले काम : मेजदा ते वाढोणा मार्गाचे डांबरीकरण
पारवा (यवतमाळ) : गावातून गेलेला रस्ता गुळगुळीत झाल्याचे पाहून नागरिकांना आनंद झाला. पण, तो औटघटकेचा ठरला. रात्रभरात उरकलेल्या कामाचे पितळ सकाळी उघडे पडले. झालेला डांबरी रस्ता चक्क हाताने उकरला जात आहे. संबंधित यंत्रणा हे काम पुन्हा करून घेते की, कंत्राटदाराची पाठराखण करते, याकडे मेजदा येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मेजदा ते वाढोणा रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. रात्री ११:०० वाजता या कामाला सुरुवात करण्यात आली. सकाळी गावकरी जागे झाल्यानंतर या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली. तेव्हा रस्ता उकरत असल्याचे लक्षात आले. चक्क हाताने रस्ता उकरत असल्याने या कामात झालेला गोंधळ लक्षात आला. डांबरीकरण करताना रस्त्यावरील धूळ, माती झाडण्यात आली नाही. त्यावरच डांबरीकरण करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
रस्त्याचे काम करताना संबंधित विभागाचे कुठलेही अधिकारी उपस्थित नव्हते. कंत्राटदाराने मनमानी पध्दतीने काम केले. झालेल्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सुभाष कुळमते, खुशाल सुरपाम, संदीप खाटे, गणेश झाडे, ओम रवी घराटे, विष्णू पुसनाके, ईश्वर खाटे, प्रशांत आडे, प्रकाश नारनवरे, उमेश कुडमते आदींनी ही मागणी लावून धरली आहे. यावर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.