अंगणवाडीताई आणि आरोग्यसेविका आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 09:54 PM2018-10-01T21:54:00+5:302018-10-01T21:54:17+5:30
जिल्हाभरातील अंगणवाडीताई आणि आरोग्य सेविकांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी येथील तिरंगा चौकात आयटकच्या नेतृत्वात धरणे दिले. यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. मागण्यांची पूर्तता न झाल्यास संघटना अधिक तीव्र आंदोलन करणार आहे. याविषयीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हाभरातील अंगणवाडीताई आणि आरोग्य सेविकांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी येथील तिरंगा चौकात आयटकच्या नेतृत्वात धरणे दिले. यावेळी सरकारच्या धोरणाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला. मागण्यांची पूर्तता न झाल्यास संघटना अधिक तीव्र आंदोलन करणार आहे. याविषयीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आले.
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मानधन नको तर वेतन द्या, वेतनात वाढ करा, किमान वेतन कायद्यानुसार ही वाढ नोंदविण्यात यावी आदी मागण्या यावेळी महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्यावतीने करण्यात आल्या. किमान १८ हजार रुपये वेतन देण्यात यावे ही प्रमुख मागणी आंदोलकांची होती.
अंशकालीन स्त्री परिचरांना जिल्हा परिषदेच्या सेवेत सामावून घेण्यात यावे, त्यांना चतुर्थश्रेणीचे वेतन देण्यात यावे, किमान वेतन कायद्यानुसार अंशकालीन स्त्री परिचरांना १८ हजार रुपये वेतन देण्यात यावे, प्रमाणबध्द महागाईभत्ता, रजा, सुट्या, प्रवासभत्ता, सेवा पुस्तिका, भविष्य निर्वाह निधी देण्यात यावा. यासह विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिवाकर नागपुरे, कार्याध्यक्ष मेहराबानो शेख, उपाध्यक्ष दिलीप सिडाम, सहसचिव नलिनी क्षीरसागर, जिल्हा सचिव संगीता बांगडे, कुसुम ताकसांडे, प्रिया आत्राम, हबीब खॉ पठाण, सुमन गावंडे यांच्यासह अनेक महिला यावेळी उपस्थित होत्या.