वाय सिक्युरिटीसह आमदारांचा ताफा पळाल्याने संताप, नऊ जखमीमधील एकाचा मृत्यू

By विशाल सोनटक्के | Published: January 6, 2024 05:55 PM2024-01-06T17:55:06+5:302024-01-06T17:55:16+5:30

आमदार नरेंद्र भोंडेकर शुक्रवारी दिग्रस येथे एका कार्यक्रमाकरिता आले होते.

Anger as convoy of MLAs fled with Y Security | वाय सिक्युरिटीसह आमदारांचा ताफा पळाल्याने संताप, नऊ जखमीमधील एकाचा मृत्यू

वाय सिक्युरिटीसह आमदारांचा ताफा पळाल्याने संताप, नऊ जखमीमधील एकाचा मृत्यू

दिग्रस (यवतमाळ): संपूर्ण देशात हिट ॲण्ड रन कायद्यातील कठोर तरतुदींबाबत ट्रान्सपोर्ट वाहन चालकांकडून असंतोष व्यक्त केला जात आहे. अपघात घडल्यानंतर पळून न जाता जखमीला मदत करण्यासाठी हा कायदा कठोर झाला आहे. असे असले तरी वाय सिक्युरिटी असलेले भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या ताफ्यातील वाहनाने शुक्रवारी रात्री ऑटो व दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात नऊजण जखमी झाले होते. यातील एकाचा रात्रीच उपचारादरम्यान मृत्यू झाला. आमदार भोंडेकर हे अपघातानंतर थांबले नाहीत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

आमदार नरेंद्र भोंडेकर शुक्रवारी दिग्रस येथे एका कार्यक्रमाकरिता आले होते. सायंकाळी ७:३० वाजता परत जात असताना आर्णी मार्गावर त्यांच्या ताफ्यातील वाहन क्रमांक एमएच- ३६-२२७२ याने समोरून येणाऱ्या ऑटोरिक्षा क्र.एमएच-२९-डब्ल्यू-९०७५ ला आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकी चालक गजानन जगन्नाथ जकाते (५५) रा. गांधीनगर दिग्रस, उमेश राजू मनवर (३५) रा. चिंचोली हे जखमी झाले. यासोबतच ऑटोरिक्षातील प्रवासी सै. जावेद सै. ताजुद्दीन (३८), सलमा परवीन (२४), अफसानाबी मो. जमीर (६०), प्रतीक ब्रह्मा मोरे (२०), सुरेखा गजानन बोरकर (३५) रा. आंबेडकरनगर, अनस खान वाजीद खान (१२), तोहीद खान वाजीद खान (८) सर्व रा. मोतीनगर, दिग्रस हे जखमी झाले. त्यांना दिग्रस ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील उमेश राजू मनवर, गजानन जकाते व सुरेखा बोरकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना यवतमाळ येथे हलविण्यात आले होते. यातील गजानन जगन्नाथ जकाते यांचा शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.

अपघाताची घटना घडल्यानंतर ताफ्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिग्रस पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर बऱ्याच वेळाने घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचली. त्यामुळे जखमींचा रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाला. तातडीने आमदार महोदयांनी जखमींना रुग्णालयात पोहोचविण्याची व्यवस्था केली असती तर जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. या प्रकरणात अपघातानंतर पोलिसही उशिराने घटनास्थळी दाखल झाले होते.

अपघाताचा गुन्हा दाखल

प्रमोद मधुकर मनवर, रा. चिंचोली यांच्या तक्रारीवरून धडक देणारे वाहन एमएच-३६-२२७२ च्या चालकाविरुद्ध दिग्रस पोलिसांनी शुक्रवारी रात्री अपघाताचा गुन्हा दाखल केला. आता या अपघातात मृत्यू झाल्याच्या कलमाची वाढ करावी लागणार आहे.

Web Title: Anger as convoy of MLAs fled with Y Security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.