नॅशनल हायवेच्या संथगतीने महागाव तालुक्यात संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:27 AM2021-06-19T04:27:37+5:302021-06-19T04:27:37+5:30

फोटोसंजय भगत महागाव : नागपूर, औसा, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा असा राष्ट्रीय महामार्ग अर्धापूरजवळ जोडण्यात आला आहे. नागपूरपासून महागावपर्यंत ...

Anger in Mahagaon taluka due to slowness of National Highway | नॅशनल हायवेच्या संथगतीने महागाव तालुक्यात संताप

नॅशनल हायवेच्या संथगतीने महागाव तालुक्यात संताप

googlenewsNext

फोटोसंजय भगत

महागाव : नागपूर, औसा, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा असा राष्ट्रीय महामार्ग अर्धापूरजवळ जोडण्यात आला आहे. नागपूरपासून महागावपर्यंत एक कंपनी व महागावपासून नांदेडपर्यंत दुसरी कंपनी चौपदरीकरणाचे काम करीत आहे. कामाच्या संथगतीने तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.

महागाव ते नांदेडच्या कामातील संथगती आणि अनियमितता नागरिकांच्या जिवावर उठलेली आहे. रस्ते अपघात नित्याची बाब झाली आहे. रस्त्यावरील अडथळे आणि नित्याचे अपघात केंद्र सरकारविरुद्ध असंतोषाचे कारण बनले आहे. महागाव ते नागपूरपर्यंत बऱ्यापैकी काम पूर्ण झाले. केवळ हिवरा, लोणबेहळ व अन्य काही ठिकाणी जमीन अधिग्रहण वाद न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यामुळे काम पूर्ण होऊ शकले नाही. तत्कालीन प्रकल्प संचालक प्रशांत मेंढे यांनी अल्पावधीत आपल्या कार्यकुशलतेमुळे हा रस्ता पूर्णत्त्वाला नेला आहे.

रस्त्यावरील बंद असलेले पथदिवे, अपवादवगळता पुलावर नसलेले ट्यूबलेवल, दिशादर्शक फलक, गावाच्या मराठी नावावरून हिंदी नावाचे लागलेले फलक गावाची ओळख बदलून टाकण्यास कारणीभूत ठरले आहेत. नॅशनल हायवेवर होत असलेले अतिक्रमण, रस्त्यावर साचलेले पाणी वाहून जाण्याकरिता पर्यायी जागा नसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तत्कालीन प्रकल्प संचालकांच्या बदलीनंतर विद्यमान प्रकल्प संचालकांनी या रस्त्यावरील अर्धवट कामावर अद्याप लक्ष केंद्रित केलेले दिसत नाही. १०० टक्के काम पूर्ण होण्याआधीच भांब राजा येथे टोल नाका सुरू करण्यात आला.

महागाव ते नांदेड हा रस्ता तर अपघाताला निमंत्रण देत आहे. दरम्यान, संबंधित कंपनीच्या मालक भागीदाराचे निधन झाल्यामुळे कामात कमालीची शिथिलता आली आहे. या ९० किलोमीटरमध्ये बहुतांश फुलांचे काम अर्धवट आहे. पर्यायी मजबूत वळण रस्ते नसल्यामुळे वाहतुकीला त्रास होत आहे. पावसाळा सुरू झाल्याने अपघात घडत आहेत. मात्र, जखमींना जवळच्या दवाखान्यात नेण्याची सोय किंवा रस्त्यात अपघातग्रस्त झालेले वाहन बाजूला करण्याची सुविधा नाही. अपघातग्रस्त वाहन कित्येक दिवस नॅशनल हायवेवर पडून असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.

बॉक्स

चांगले रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार

रस्त्याच्या अर्धवट आणि सदोष कामामुळे नागरिक प्रचंड वैतागले आहेत. केंद्र सरकारविरूद्ध संताप व्यक्त केला जात आहे. लोकप्रतिनिधी या कामाबद्दल ‘ब्र’ शब्द काढत नाहीत. याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे. एकीकडे रस्ते विकासावरून केंद्र सरकारची प्रतिमा उजळ होत असताना लोंबकळत पडलेल्या कामामुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. चांगले रस्ते हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे.

कोट

मध्यंतरी कंपनी मालकाचे निधन झाल्यामुळे कामात संथगती आली. काही आर्थिक प्रश्न उद्भवले होते. अधिकारी, कर्मचारी कंपनी सोडून गेले. आता काम नियमित सुरू झाले. ७० टक्के काम पूर्ण झाले. तीन महिन्यांत उर्वरित काम पूर्ण होईल. वळण रस्ते तत्काळ दुरुस्त केले जातील.

सुनील पाटील, प्रकल्प संचालक नॅशनल हायवे, नांदेड.

Web Title: Anger in Mahagaon taluka due to slowness of National Highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.