‘मजीप्रा’त बदल्यांमध्ये दुजाभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:10 AM2019-06-05T00:10:30+5:302019-06-05T00:10:57+5:30
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अमरावती विभागात वर्ग तीनमधील कर्मचाऱ्यांचे बदली सत्र राबविण्यात आले. यात दुजाभाव झाला असल्याची ओरड सुरू आहे. प्रामुख्याने यवतमाळ विभागातील कर्मचाऱ्यांना सूडबुद्धीने इतरत्र हलविल्याचा आरोप केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अमरावती विभागात वर्ग तीनमधील कर्मचाऱ्यांचे बदली सत्र राबविण्यात आले. यात दुजाभाव झाला असल्याची ओरड सुरू आहे. प्रामुख्याने यवतमाळ विभागातील कर्मचाऱ्यांना सूडबुद्धीने इतरत्र हलविल्याचा आरोप केला जात आहे. काही विभागात मुक्कामी कर्मचाऱ्यांची अर्थात अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी असलेल्यांची गर्दी आहे. त्यांची बदली करण्यात हा विभाग विसरला आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने वर्ग तीनमधील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. अमरावती विभागात येत असलेल्या विभागीय कार्यालयातील ३० कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात आले. यासाठी कर्मचाऱ्यांकडून पर्याय मागण्यात आले होते. प्रत्यक्षात बदली करताना पर्यायाव्यतिरिक्त गाव देण्यात आले. विशेष म्हणजे, अमरावती, अकोला विभागातील कर्मचाऱ्यांना त्याच जिल्ह्यात बदली दिली आहे. यवतमाळातील काही कर्मचाºयांना मात्र जिल्ह्याबाहेर फेकण्यात आले आहे.
बदली झालेले कर्मचारी वर्षा-दोन वर्षात सेवानिवृत्त होणारे आहेत. शासकीय सेवेचा शेवटचा कार्यकाळ गृह जिल्ह्यातच व्हावा, अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा असते आणि तसे संकेतही आहेत. तरीही येथील कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली. विनंती बदल्यांचाही विचार केला गेला नाही. या सर्व प्रकारामुळे आधीच कर्मचाऱ्यांची टंचाई असलेल्या यवतमाळ विभागात पुन्हा खड्डा पडला आहे. शिवाय बदली झालेल्या कर्मचाऱ्यांनी राजकीय अथवा इतर प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास कारवाई केली जाईल, असेही बजावण्यात आले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील वर्ग तीन कर्मचाऱ्यांच्या बदल्या अन्यायकारक आहे. वरिष्ठांकडून याची दखल घेतली जावी.
- राजाराम विठाळकर, सरचिटणीस, मजीप्रा कर्मचारी संघटना