सुनील डिवरेंच्या हत्येनंतर तणाव, नागपूर-तुळजापूर मार्गावर गावकऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 02:16 PM2022-02-04T14:16:28+5:302022-02-04T15:12:26+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व शिवसेना कार्यकर्ते सुनील डिवरे यांची काल रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर गावात व आसपासच्या परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.
यवतमाळ : तालुक्यातील भांबराजा येथील माजी सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व शिवसेना कार्यकर्ते सुनील डिवरे यांच्या हत्या प्रकरणानंतर परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. या घटनेचे परिसरात तीव्र पडसाद उमटले असून संतप्त ग्रामस्थांनी नागपूर-तुळजापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल २ तास खोळंबली होती.
सुनील डिवरे हे गुरुवारी सायंकाळी घराच्या अंगणात बसलेले असताना पांढऱ्या रंगाच्या ॲक्टीव्हावरून तीन जण आले. त्यापैकी एकाने ॲक्टीव्हा सरळ करून ठेवली. उर्वरित दोघांनी डिवरे यांच्यावर गोळ्या झाडल्या. नंतर कुऱ्हाडीने त्यांच्या डोक्यावर घाव घातले. काही कळायच्या आत हे हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. यावेळी आरडाओरडा ऐकून डिवरे यांच्या पत्नी अनुप्रिया घरातून अंगणात धावत आल्या. सुनील डिवरे हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले होते. त्यांना वाहनात टाकून शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र शासकीय रुग्णालयातील डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आज या घटनेचे तीव्र पडसाद भांबराजा व परिसरात उमटले. संतप्त गावकऱ्यांनी आरोपींच्या तत्काळ अटकेची मागणी करत रस्ता रोको आंदोलन केले, टायरची जाळपोळही करण्यात आली.
पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली असली तर अजून काही आरोपी फरार असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. या घटनेमागील नेमकं कारण काय ते अद्याप समजू शकलेलं नाही. पण या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
परिस्थिती लक्षात घेत शिवसेनेचे दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड यांनी सुनील डिवरे यांच्या नातेवाईक, ग्रामस्थ व शिवसैनिकांना फोनवरून आवाहन करीत रास्तारोको आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार आंदोलन मागे घेण्यात आले असून एक तासानंतर वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती आंदोलकांनी दिली.