लाखोंच्या केळी बनल्या जनावरांचा चारा; यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 07:00 AM2020-05-18T07:00:00+5:302020-05-18T07:00:21+5:30
कोरोना विषाणूमुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाला आहे. मागणीच नसल्याने व्यापाऱ्यांकडून केळीची उचल झाली नाही. त्यामुळे लाखो रुपयांच्या केळी जनावरांना चारा म्हणून खाऊ घालण्याची वेळ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आली आहे.
हमीद खाँ पठाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणूमुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन सुरू झाला आहे. याचा परिणाम केळी पिकावरही प्रचंड प्रमाणात झाला आहे. मागणीच नसल्याने व्यापाऱ्यांकडून केळीची उचल झाली नाही. त्यामुळे लाखो रुपयांच्या केळी जनावरांना चारा म्हणून खाऊ घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
वीज समस्या, पाणीटंचाई, नैसर्गिक संकट, बदलते वातावरण यावर मात करत शेतकऱ्यांनी केळीचे बगीचे फुलविले. त्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले. लाखो रुपये खर्च करून जोपासणा केली. यातून मोठे उत्पन्न येईल, अशी आशा असतानाच लॉकडाऊनमुळे त्यावर पाणी फेरले गेले. केळीची किरकोळ विक्री करण्याचाही प्रयत्न झाला. हा प्रयोग यशस्वी होत नसल्याचे लक्षात येताच जनावरांचा चारा म्हणून केळी वापरल्या गेल्या.
परिसरातील सर्वच फलोत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळाचा तडाखाही बगीच्यांना बसला आहे. शासनाने तातडीने सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
लॉकडाऊनपूर्वी मिळाला चांगला भाव
वडगाव (जंगल) येथील गजानन पोटे यांनी आपल्या तीन एकर शेतात केळीची लागवड केली. यातून सहा ते सात लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. लॉकडाऊनपूर्वी केळीची पहिली खेप सुमारे ९० हजार रुपयांनी विक्री झाली. त्यावेळी बाजारभावही चांगला होता. लॉकडाऊन झाल्यापासून केळीचे काढणीला आलेले पीक जागीच खराब होत आहे. त्यामुळे त्यांनी ही केळी जनावरांपुढे चारा म्हणून टाकणे सुरू केले.