शेतकऱ्यांसह जनावरे संकटात
By admin | Published: July 7, 2014 11:48 PM2014-07-07T23:48:44+5:302014-07-07T23:48:44+5:30
खरीप हंगामाला सुरूवात होताच जून महिन्यात ८० टक्के शेतकऱ्यांनी परेणीला सुरूवात केली़ परंतु जून महिन्याच्या शेवटपर्यंत पुरेसा पाणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांसह आता त्यांची जनावरेही संकटात सापडली आहेत.
गणेश रांगणकर - नांदेपेरा
खरीप हंगामाला सुरूवात होताच जून महिन्यात ८० टक्के शेतकऱ्यांनी परेणीला सुरूवात केली़ परंतु जून महिन्याच्या शेवटपर्यंत पुरेसा पाणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांसह आता त्यांची जनावरेही संकटात सापडली आहेत. परिसरात चारा टंइर्चा गंभीर रुप धारण करण्याचे संकेत प्राप्त होत आहे.
वणी तालुक्यात कोरडवाहू क्षेत्र जास्त प्रमाणात असल्याने शेती निसर्गाच्या पावसावरच अवलंंबून असते़ यावर्षी अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली आहे़ दुबार, तिबार पेरणी करूनही बियाणे न अंकुरल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत़ चोहोबाजूंनी वृक्षतोड होत असल्याने निसर्ग चांगलाच कोपला आहे. त्यातच शहरासभोवती दररोज नवीन ले-आऊट पड आहे. विविध कंपन्या शेती संपादित करीत करीत आहे. गावगोावी अनेक कंपन्यांचे टॉवर्स उभे राहात आहे. या सर्वांचा निसर्गावर विपरीत परिणाम होत असून निसर्गातही बदल होत आहे़ त्यामुळेच जुलैचा आठवडाही लोटूनही अद्याप ावसाचा पत्ता नाही. परिणामी निसर्गच कोपला की काय, अशी गावागावात चर्चा आहे़
यापूर्वी कर्जात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर दुबार, तिबार पेरणी कशी करावी, बियाणे खरेदी कुठून करायचे, संसार कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळणे अशक्य झाले आहे. त्यातच वरूण राजा कोपल्याने त्यांच्या उरल्यासुरल्या आशाही मावळत आहे. वरूण राजाला साकडे घालत आता गावागावांमध्ये पूजा, काला, गाव जेवण दिले जात आहे़ तथापि पावसाचा अजूनही पत्ताच नाही़ बँकेनेही वाढीव पीक कर्ज देण्यास नकार देणे सुरू केले आहे. त्याचाच लाभ घेत सावकार घेत आहेत. अवैध सावकार अव्वाच्या सव्वा व्याज आकारून शेतकऱ्यांना कर्जाऊ पैसे देत आहेत. यात अखेर शेतकरीच भरडला जात आहे.
गेल्या चार वर्षांपासून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढला होता. मात्र आजपर्यंत संबंधित विमा कंपनीकडून एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई रक्कम मिळाली नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडेही आता पाठ फिरविली आहे़ पावसाने दगा दिल्याने आता जनावरांना लागणारा चाराही संपला आहे़ पाऊस न आल्यामुळे हिरवा चारा उगविला नाही़ त्यामुळे जनावरांची भूक कशी भागवावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे़
पूर्वी पावसाळ्यात जंगलामध्ये चारा असायचा. परंतु सर्वत्र जंगलतोड झाल्यामुळे तसेच अनेक भूमिहीनांनी जंगलावर अतिक्रमण करून शेती करणे सुरू केल्याने आता जंगलातही चारा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे चारा टंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावागावांमध्ये पूर्वी जनावरे चारण्यासाठी गायकी असायचा. आता चारा टंचाईमुळे गावात गायकीही दिसत नाही. गुरे कुठे चारावी, असा प्रश्न त्यांना सतावत असल्याने त्यांनी गुरे पाळणेच सोडून दिले आहे. पावसाच्या दडीने शेतकरी आणि जनावरे आता संकटात सापडली आहेत. तथापि शेतकऱ्यांच्या मदतीकरिता अद्याप कुणीही हात पुढे केला नाही़ महसूल प्रशासन व लोकप्रतिनिधी बघ्याची भूमिका घेऊन आहे. अद्याप कोणतेही सर्व्हेक्षण झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधी मात्र विधानसभेच्या निवडणुकीत व्यस्त आहे़ शेतकरी संकटात असून त्यांची गंभीर समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी आता कोण धाऊन येईल, अशी आस बाळगून बळीराजा दिवस कंठत आहे.