अंजनखेडच्या वृध्द माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला
By admin | Published: February 25, 2017 12:56 AM2017-02-25T00:56:07+5:302017-02-25T00:56:07+5:30
जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीला आर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गालबोट लागले आहे.
राजकीय वैमनस्य : निवडणुकीला गालबोट
आर्णी : जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीला आर्णी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गालबोट लागले आहे. राजकीय वैमनस्यातून दोघांनी अंजनखेड येथील वयोवृद्ध माजी सरपंच यादवराव गुलाबराव वानखडे (७५) यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. जखमी यादवराव यांना प्राथमिक उपचारानंतर तातडीने नागपूरला हलविण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा परिषद निवडणुकीत यादवराव वानखडे यांच्या कुटुंबातील महिला सदस्य काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाल्या. त्याचा राग धरुन हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी अशोक शंकरराव वानखडे यांच्या तक्रारीवरून आर्णी पोलिसांनी भादंवि ३०७, ५०४, ५०६, ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. स्वप्नील पेंदोर (२२) व प्रदीप धोंडू पेंदोर (२०) दोनही रा. अंजनखेड अशी आरोपींची नावे आहेत. हल्ल्यानंतर पसार झालेले आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाही. दरम्यान आर्णी तालुका काँग्रेस कमिटीचे प्रमुख साजिद बेग यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदविला आहे. (तालुका प्रतिनिधी)