ती निघून गेलेली विराणी.. संसार तोलणारी जिंदगानी !
By अविनाश साबापुरे | Published: May 14, 2024 05:47 PM2024-05-14T17:47:32+5:302024-05-14T17:49:21+5:30
Yavatmal : अंकुरच्या कवी संमेलनात मातृशक्तीचा जागर
यवतमाळ :
ती कधी भरल्या कुंकवासोबत
निघून गेलेली विराणी असते
सारा संसार खांद्यावर
तोलून धरणारी जिंदगानी असते
ती कुणाची आई असते...
अशा आशयगर्भ कवितांनी रसिकांना आईची महती पुन्हा एकदा समजावून सांगितली. निमित्त होते अंकुर साहित्य संघाने आयोजित केलेल्या कविसंमेलनाचे आणि औचित्य अर्थातच मातृदिनाचे होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डायटचे प्राचार्य डाॅ. प्रशांत गावंडे होते. प्रमुख अतिथी प्रसिद्ध गझलकार विनोद बुरबुरे, ज्येष्ठ कवी दिनुभाऊ वानखडे, अंकुर साहित्य संघाचे केंद्रीय उपाध्यक्ष सुरेश गांजरे, जिल्हा उपाध्यक्ष मनोहर शहारे, संयोजक व जिल्हाध्यक्ष विद्या सुनील खडसे, तालुकाध्यक्ष प्रमोद देशपांडे, डॉ. दीपक सव्वालाखे मंचावर उपस्थित होते. कवी संमेलनात अनेक कवींनी आईविषयीची भावना व्यक्त केली. सोनल गादेवार यांनी -
आई तुझ्याचसाठी देवास मी म्हणावे
आई तुझी मी होऊन वात्सल्य तुला द्यावे...
या शब्दातून कृतज्ञता व्यक्त केली. दिनुभाऊ वानखडे यांनी आईतील बाईपण सांगताना - ‘ती कधी भरल्या कुंकवासोबत निघून गेलेली विराणी असते... कधी घरधण्याच्या माघारी सारा संसार आपल्या खांद्यावर तोलून धरणारी जिंदगानी असते... ती कुणाची आई असते...’ अशा ओळी पेश केल्या. प्रिती गोगटे यांनी ‘ऋण फेडता या धरतीचे सारे मिळूनी श्रमू...’ स्मिता भट यांनी ‘मी हिंदोळा, तू अवखळ वारा.. तुझा स्पर्श रेशमी वारा...’ असा आईचा स्पर्श कवितेतून मांडला. तसेच बापाची महती सांगताना मनोहर बडवे यांनी आपल्या कवितेतून ‘जीवनभर हा धडपडणारा बाप कुणाला कळतो का?’ असा सवाल उपस्थित केला. महेश अडगुलवार, राजश्री बींड, प्रमिला उमरेडकर, तात्याजी राखुंडे, महेश किनगावकर, नितीन धोटे, मंगेश चौधरी, मनोहर बडवे, डॉ. दीपक सव्वालाखे, राजेंद्र फुन्ने, समिना शेख, अरविंद झाडें आदी कविंनी आपल्या रचना सादर केल्या.
विशेष बालकाच्या आईकडून घ्यावी प्रेरणा : डाॅ. गावंडे
जेव्हा सामान्य आईला बालकाच्या संगोपणात थकवा येत असेल तर तिने विशेष बालकाच्या आईकडे बघून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन डायटचे प्राचार्य तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रशांत गावंडे यांनी यावेळी केले. याच कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा अंकुरच्या वतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये सुनिता काळे व विलास काळे, बालगायिका गीत बागडे, संजना व प्रशांत बागडे, प्रमोदिनी रामटेके, प्रमिला उमरेडकर, मनोहर शहारे, लालाजी जैस्वाल, राखुंडे आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता शिरभाते आणि कल्पना देशमुख यांनी, प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष विद्या खडसे तर आभार पल्लवी ठाकरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सुनिल खडसे, सचिव महेश मोकडे, जिल्हासचिव नितीन धोटे, कोषाध्यक्ष सुरेश राऊत, अल्का राऊत, चंद्रशेखर ठाकरे, तोष्णा मोकडे, पूजा देशपांडे, अर्चना वासेकर, खालिक शेख, साहेबराव ठाकरे यांनी परिश्रम घेतले.