अंकुर साहित्य संमेलनाचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 10:08 PM2017-12-25T22:08:12+5:302017-12-25T22:08:23+5:30
दोन दिवस विविध साहित्य प्रकरांची मेजवाणी देणाऱ्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी दिमाखदार समारोप झाला. परिसंवाद, कविसंमेलन, गझल मुशायरा ऐकताना मंत्रमुग्ध झालेले हजारो श्रोते समारोपाच्या कार्यक्रमात भावूक झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : दोन दिवस विविध साहित्य प्रकरांची मेजवाणी देणाऱ्या अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलनाचा रविवारी दिमाखदार समारोप झाला. परिसंवाद, कविसंमेलन, गझल मुशायरा ऐकताना मंत्रमुग्ध झालेले हजारो श्रोते समारोपाच्या कार्यक्रमात भावूक झाले होते.
अंकुर साहित्य संघाच्या यवतमाळ शाखेतर्फे ५६ वे अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलन पार पडले. समारोपीय सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे होते. विचारमंचावर माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके, प्रा. रमाकांत कोलते, वसंतराव घुईखेडकर, अरविंद तायडे, प्रवीण देशमुख, अण्णाभाऊ डांगे, अंकुरचे केंद्रीय अध्यक्ष अरविंद भोंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अशा प्रकारचे साहित्य संमेलन पुढच्या वर्षीसुद्धा आपल्या यवतमाळनगरीमध्ये व्हावे, अशी भावना अध्यक्षीय भाषणातून माणिकराव ठाकरे यांनी बोलून दाखविली. वर्तमान परिस्थितीत शिक्षणाची अवस्था अत्यंत हलाखीची झाली आहे. त्यातच शासन इंग्रजी शाळांना मान्यता देत असल्यामुळे मातृभाषेची गळचेपी होत आहे, अशी खंत प्रा. रमाकांत कोलते यांनी व्यक्त केली. मराठी भाषा जगली पाहिजे ही भावना त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. प्रा. वसंतराव पुरके यांनी नेहमीच्या मिश्किल शैलीत प्रेक्षकांची दाद मिळविली. आपण आज ज्या उंचीपर्यंत पोहोचलो आहोत, त्यात साहित्याचाच मोलाचा वाटा आहे, असे पुरके म्हणाले.
यावेळी विविध क्षेत्रात वैविध्यपूर्ण कामगिरी करणाºया मान्यवरांचा गौरवचिन्ह, मानपत्र व शाल देऊन सत्कार करण्यात आला. ज्यांच्या अथक परिश्रमाने संमेलन यशस्वी झाले, त्या खडसे दाम्पत्याचा प्रा. वसंतराव पुरके यांच्या हस्ते मनोज्ञ सत्कार करण्यात आला. सत्कार स्वीकारताना सुनिल खडसे आणि विद्याताई खडसे हे दाम्पत्य गलबलून गेले होते. विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या या संमेलनाचा मुख्य गाभा हा शेतकऱ्यांच्या समस्यांवर केंद्रित होता. परिसंवाद, कविसंमेलन, गझलमुशायरा आदी कार्यक्रमाच्या माध्यमातून त्याचे प्रतिबिंब उमटले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास चावरे व प्रा. ताराचंद कंठाळे यांनी केले. तर आभार शहारे यांनी मानले. संमेलनाच्या यशस्वितेसाठी मनोहर शहारे, महेश अडगुलवार, सुरेश राऊत, सुरेश गांजरे, प्रा. महेश मोकडे, सुवर्णा ठाकरे, नितीन धोटे, दत्ता चांदोरे या अंकुरच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
व्यंगचित्रांचे प्रदर्शन
साहित्य संमेलनस्थळी यवतमाळ येथील प्रसिद्ध व्यंगचित्रकार सुरेश राऊत यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. कवी, साहित्यिक, चित्रकार आदींवर आधारित हे व्यंगचित्र होते. उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी आणि संमेलनाच्या दोन दिवसपर्यंत नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. सुरेश राऊत यांनी या व्यंगचित्राविषयी उपस्थितांना माहिती दिली.