नोटाबंदी वर्षश्राद्धावर जिल्हाभर आंदोलने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 11:17 PM2017-11-08T23:17:46+5:302017-11-08T23:17:58+5:30
‘मेरे प्यारे देशवासीयो... ’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्रीपासून चलनातील ५०० आणि एक हजाराची नोट बंद करण्याची घोषणा केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘मेरे प्यारे देशवासीयो... ’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्रीपासून चलनातील ५०० आणि एक हजाराची नोट बंद करण्याची घोषणा केली. या नोटाबंदीने देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली असून देशाचे वाटोळे झाल्याचा आरोप करीत विविध संघटना, पक्षांनी बुधवारी जिल्हाभर आंदोलने केली. यवतमाळसह उमरखेड, राळेगाव, आर्णी, घाटंजी, बाभूळगावात आंदोलने झाली.
८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून चलनातील पाचशे आणि हजारांची नोट बंद झाली. या घटनेला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात नोटाबंदीने देशाची अर्थव्यवस्था कोलमडली. केंद्र सरकारच्या निर्णयाने देशाचेच वाटोळे झाले, असा आरोप करीत यवतमाळात शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने तिरंगा चौकात नोटांचे श्राद्ध केले. शेतकरी संघटना राज्य सुकाणू समिती आणि शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीच्या नेतृत्वात जुन्या नोटांचे श्राद्ध करण्यात आले. यावेळी विधीवत व शास्त्रशुध्द पद्धतीने नोटांची पूजा करण्यात आली. नंतर सरकारच्या धोरणाचा खरपूस समाचार घेण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांनी काळ्या फिती लावून सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध नोंदविला. या निर्णयामुळे प्रत्येक नागरिक प्रभावीत झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला.