दुष्काळ जाहीर करा, अन्यथा आंदोलन
By admin | Published: July 20, 2014 12:11 AM2014-07-20T00:11:54+5:302014-07-20T00:11:54+5:30
यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे महागाव तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले असताना जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
ईजनी : यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे महागाव तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले असताना जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा बेमुदत उपोषण आंदोलनाचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
महागाव तालुक्यात यावर्षी खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने दुबार पेरणीनंतरही बियाणे उगवले नाही. मागील वर्षी खरिपाच्या हंगामात अतिवृष्टीमुळे आणि त्यानंतर रबी हंगामात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक नष्ट झाले. त्याच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या अपेक्षा खरीप हंगामावर होत्या. परंतु पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार व काही ठिकाणी तिबार पेरणीची वेळ आली आहे.
महागाव तालुक्यात सध्या शेतमजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी हेक्टरी २० हजार रुपये मदत देऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी व जनावरासाठी त्वरित चाराडेपोची व्यवस्था करावी, अशा मागणीचे निवेदन ईजनी व करंजखेड येथील शेतकऱ्यांनी महागाव तहसीलदारांना दिले. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. या वेळी केदार पानपट्टे, नितीन पाचकोरे, संदेश वानखेडे, अमोल गावंडे, श्रीराम शेंडगे, अनिल वानखेडे, प्रवीण ठाकरे, आशिष वानखेडे, आशिष टनमने, संदीप रावते, अमोल पाचकोरे, रामभाऊ कांबळे, अविनाश मस्के आदींसह असंख्य शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)