जिल्हा बँक आॅनलाईन परीक्षेच्या अखेर तारखा जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 10:10 PM2019-06-14T22:10:25+5:302019-06-14T22:11:03+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या आॅनलाईन परीक्षेसाठी अखेर मुहूर्त निश्चित झाला असून कंत्राटदार कंपनीने तारखा जाहीर केल्या आहेत. यवतमाळातील नंदूरकर विद्यालय हे या परीक्षेसाठी केंद्र राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या आॅनलाईन परीक्षेसाठी अखेर मुहूर्त निश्चित झाला असून कंत्राटदार कंपनीने तारखा जाहीर केल्या आहेत.
यवतमाळातील नंदूरकर विद्यालय हे या परीक्षेसाठी केंद्र राहणार आहे. २० जूनला शिपाई पदासाठी आॅनलाईन परीक्षा होईल तर २१, २२ व २३ जूनला लिपिक पदासाठी आॅनलाईन परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिकाच्या १३३ व शिपायाच्या १४ अशा १४७ जागांसाठी आॅनलाईन परीक्षेद्वारे नोकरभरती घेतली जात आहे. अमरावती येथील एका खासगी एजंसीला सहकार मंत्रालय व आयुक्तालय स्तरावरूनच नोकरभरतीचे हे कंत्राट देण्यात आले आहे. ही नोकरभरती बँकेच्या बहुतांश संचालकांसाठी व सहकारातील राजकीय-शासकीय घटकांसाठी जणू पर्वणी ठरली आहे. या भरतीच्या आड अनेक उमेदवारांनी ‘डिलिंग’ केल्याची माहिती आहे.
काही संचालकांनी क्षमतेपेक्षा अधिक उमेदवारांना ‘टोकण’वर ‘शब्द’ दिल्याचे सांगण्यात येते. संचालकांच्या या हालचाली पाहता या भरतीकडे साशंकतेने पाहिले जात आहे. कुणाचा ‘कोटा’ किती यावर अद्याप एकमत झालेले नाहीत. मात्र संचालक आपल्या स्तरावर तयारी करीत आहे. परीक्षेअंती उत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांची शिकार करण्याची व्यूहरचना आखली जात असल्याचीही माहिती आहे.
संचालकांच्या हाती केवळ पाच गुण
या परीक्षेत पाच गुण शैक्षणिक दाखल्यांवर तर पाच गुण मुलाखतीवर दिले जाणार आहे. मुलाखतीचे गुण संचालकांच्या हातात आहे. त्या बळावरच लेखी परीक्षेत चांगले गुण मिळविलेल्या उमेदवारांना हेरुन आपले काम फत्ते करण्याचा विचार या संचालकांमध्ये सुरू असल्याचे सांगितले जाते.