वसंतराव नाईक कृषी पुरस्कारांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 12:09 PM2018-08-11T12:09:04+5:302018-08-11T12:11:09+5:30
वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या वसंतराव नाईक कृषी पुरस्कारासाठी राज्यातील सात प्रयोगशील शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या वसंतराव नाईक कृषी पुरस्कारासाठी राज्यातील सात प्रयोगशील शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रातील या निवडक शेतकऱ्यांना दिवंगत मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या ३९ व्या स्मृतिदिनी १८ आॅगस्टला पुरस्काराचे वितरण केले जाईल, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषीभूषण दीपक आसेगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. पालकमंत्री मदन येरावार, बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व केंद्र प्रमुख डॉ.सैयद शाकीर अली, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरित केले जाणार आहे, अशी माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली. याशिवाय कपाशीवर बोंडअळीचे नियंत्रण या विषयावरील पुरस्कारासाठी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विलास भाले व केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूरचे डॉ.व्ही.चेन्नाबाबू नाईक यांची निवडही घोषित करण्यात आली. पत्रकार परिषदेला प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक आमदार मनोहरराव नाईक, स्वागताध्यक्ष डॉ.एन.पी. हिराणी, प्रा.आप्पाराव चिरडे, प्रा.गोविंद फुके आदी उपस्थित होते.
पुरस्कारासाठी निवड झालेले शेतकरी
विठ्ठलराव गणपत घारे, माजी आमदार (काळुस्ते ता. इगतपुरी जि. नाशिक- भातशेती), ब्रह्मदेव नवनाथ सरडे (सोगाव पूर्व ता. करमाळा जि.सोलापूर- ऊस उत्पादन), आनंदराव नाथा गाडेकर (बोरबन ता. संगमनेर जि.अहमदनगर- निर्यातक्षम डाळींब), किरण नवनाथ डोके (कंदर ता. करमाळा जि. सोलापूर- केळी उत्पादन), रवींद्र माणिकराव मेटकर (म्हसला -बडनेरा जि. अमरावती- कुक्कुटपालन), सुरेश प्रकाशराव पतंगराव (अंबोडा ता.महागाव जि.यवतमाळ- रेशीम शेती), श्याम मांगीलाल गट्टाणी (जानेफळ ता.मेहकर जि.बुलडाणा, सीताफळ).