जेडीआयईटीमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन ‘युफोरिया-२०’ उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2020 06:00 AM2020-02-03T06:00:00+5:302020-02-03T06:00:07+5:30
दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये महाविद्यालयातून पहिली आलेली इंद्रनील कौर हिला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. यावेळी ग्रॅज्यूएशन डे सेरेमनीमध्ये सत्र २०१८-१९ व २०१९-२० मध्ये उत्तीर्ण आणि विद्यापीठात गुणवत्ता यादीत आलेल्या २८ विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार आणि पदवी प्रदान करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘युफोरिया-२०’ उत्साहात पार पडले. सांस्कृतिक कार्यक्रम, माजी विद्यार्थ्यांचा गौरव, विद्यापीठाच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांसह क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आदी कार्यक्रम यामध्ये घेण्यात आले.
स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माँ सरस्वती आणि स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला हारार्पण आणि दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी अध्यक्षस्थानी जवाहरलाल दर्डा एज्यूकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा होते. सोसायटीचे सदस्य डॉ. लव दर्डा, प्रभारी प्राचार्य डॉ. डी.एन. चौधरी, ‘युफोरिया-२०’चे समन्वयक डॉ. पंकज पंडित, सोनाली लव दर्डा आदी उपस्थित होते. विद्यार्थी प्रतिनिधी प्रगती मुंडेकर, अभिषेक गोडेकर, तेजल दानखडे, नेहा दुर्गे, धनंजय तुळसकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
नृत्य, वादविवाद स्पर्धा, कविसंमेलन, नाटिका, फॅशन शो, बेस्ट स्टुडंट स्पर्धा, कला प्रदर्शन, ऑर्केस्ट्रा आदी कार्यक्रमात विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संघातील कलरकोटचे मानकरी गौरी राऊत (टेबल टेनिस), देवांशू आकरे (वेटलिफ्टिंग) यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे प्रतिनिधी व क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांनाही सन्मानित करण्यात आले.
दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये महाविद्यालयातून पहिली आलेली इंद्रनील कौर हिला सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. यावेळी ग्रॅज्यूएशन डे सेरेमनीमध्ये सत्र २०१८-१९ व २०१९-२० मध्ये उत्तीर्ण आणि विद्यापीठात गुणवत्ता यादीत आलेल्या २८ विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार आणि पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव किशोर दर्डा होते. प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती विभाग तंत्रशिक्षण सहायक संचालक डॉ. डी.व्ही. जाधव, बँक ऑफ इंडिया मुख्य शाखेचे व्यवस्थापक अनुप कुमार लाभले होते.
समारोपीय कार्यक्रमात ‘युफोरिया-२०’मधील विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अपर जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन लाभले होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी भावनिक संवाद साधत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भाषा, धर्म, जाती, विपरित परिस्थिती, गरीबी आदी बाबी व्यक्तीच्या यशामध्ये बाधा बनू शकत नाही. आपले ध्येय निश्चित करा, त्यासाठी पूर्ण ताकदीने व नियोजनबद्ध रितीने परिश्रम व प्रयत्नाची पराकाष्टा करा, असा मोलाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
या कार्यक्रमात महाविद्यालयाचा सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार प्रा. प्रगती पवार, सर्वोत्तम शिक्षकेतर कर्मचारी (टेक्नीकल) पुरस्कार सचिन लिमसे, शिक्षकेतर कर्मचारी (नॉन टेक्नीकल) पुरस्कार सुधीर ससनकार आणि सपोर्टिंग स्टाफचा पुरस्कार बबन माने यांना देण्यात आला. स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच यावर्षीचा सर्वोत्कृष्ट विद्यार्थी हा मानाचा पुरस्कार इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग अंतिम वर्षाची विद्यार्थिनी तेजल दानखडे हिला देण्यात आला. सलग चौथ्यावर्षी तिने हा मान मिळविला आहे. या कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी आदींची उपस्थिती होती.