वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी राज्याकडून आणखी १०० कोटी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 04:04 AM2019-01-20T04:04:32+5:302019-01-20T04:04:39+5:30
जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे.
यवतमाळ : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. या कामाला गती देण्यासाठी राज्य शासनाने शनिवारी आणखी १०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे.
नवीन रेल्वे मार्ग पूर्ण होण्यासाठी अंदाजे २,५०१ कोटी खर्च येणार आहे. हा खर्च ६० टक्के केंद्र व ४० टक्के राज्य शासन करणार आहे. खर्चातील १ हजार कोटी ४२ लाख एवढा वाटा राज्याला उचलायचा आहे. रेल्वे मंत्रालयाने ३१ मार्च, २०१८ पर्यंत ६०३कोटी ६७ लाख रुपये खर्च केले. मार्च, २०१९ पर्यंत पुन्हा ७९ कोटी रुपयांची कामे केली जाणार आहे. राज्याने मार्च, २०१८ पर्यंत २५४ कोटी ०६ लाख रुपये उपलब्ध करून दिले, तर चालू वर्षी ७५ कोटी वितरित केले. आणखी १०० कोटी रुपये वितरित करण्यात येतील.
>विजय दर्डा यांचे प्रयत्न सत्कारणी
‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन तथा माजी खासदार विजय दर्डा यांनी या नवीन रेल्वे मार्गाला मंजुरी मिळवून देण्यापासून, तर विशेष प्रकल्पाचा दर्जा प्राप्त करून देण्यापर्यंत पाठपुरावा केला. त्यातूनच फेब्रुवारी २००८ मध्ये मंजुरी मिळाली. त्यानंतर, तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. निधी मिळण्यासाठी विजय दर्डा, खा. भावनाताई गवळी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे १०० कोटी निधी मिळाला.