राज्यात महामार्ग पोलिसांची आणखी १३ नवी पथके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 06:13 PM2020-07-10T18:13:39+5:302020-07-10T18:14:05+5:30
राज्यात विविध राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गांवर महामार्ग पोलिसांची ६३ कार्यालये कार्यान्वित आहेत. आता नव्या मंजुरीमुळे त्यात आणखी १३ कार्यालयांची भर पडणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यात विविध राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य मार्गांवर महामार्गपोलिसांची ६३ कार्यालये कार्यान्वित आहेत. आता नव्या मंजुरीमुळे त्यात आणखी १३ कार्यालयांची भर पडणार आहे.
नव्याने मंजूर १३ महामार्ग कार्यालयांंमध्ये नागपूर-विदर्भ परिक्षेत्रातील सहा पथकांचा समावेश आहे. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर, यवतमाळ ग्रामीण, गडचिरोली, हिंगोली तसेच नांदेडमधील देगलुर ही पथके आहेत. याशिवाय ठाणे ग्रामीण, रायगड, पुणे ग्रामीण, सांगली, कोल्हापूर, सोलापूर ग्रामीण, नाशिक ग्रामीण, नंदूरबार या जिल्ह्यांमध्येही महामार्ग पथके नव्याने मंजूर केली गेली.
विविध वाहतूक पथकांकरिता २१४४ जागा
राज्यात पोलीस शिपाई व चालकांच्या दहा हजार जागांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यापैकी दोन हजार १४४ जागा राज्यातील विविध वाहतूक पथकांकरिता मंजूर करण्यात आल्या आहेत. यातील ५७२ जागा या केवळ महामार्ग सुरक्षा पथकांकरिता मंजूर आहेत. अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कारगांवकर यांनी ८ जुलै रोजी या संबंधीचे आदेश जारी केले आहेत. नव्याने महामार्ग पथके मंजूर झालेल्या संबंधित घटक पोलीस प्रमुखांना या जागा भरण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
एकट्या विदर्भात १६ पथके
महामार्ग सुरक्षा विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनेक जागा रिक्त आहेत. प्रतिनियुक्तीवर आलेल्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळही संपला आहे. त्यामुळे तेथे नव्या चेहऱ्यांना प्रतिनियुक्ती दिली जाणार आहे. एकट्या विदर्भात १६ पथके आहेत. त्यात आता आणखी सहाची भर पडली आहे.
महामार्ग पथकांंना हक्काच्या जागा नाहीत
राज्यात आता ७६ ठिकाणी महामार्ग सुरक्षा पोलिसांची पथके कार्यरत होणार असली तरी यातील बहुतांश पथकांना हक्काची जागा नाही. किरायाच्या खोलीत अनेक कार्यालये सुरू आहेत. प्रत्येक पथक प्रमुखांनी आपल्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून शासकीय जागा उपलब्ध करून घ्यावी असे निर्देश अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी अलिकडेच दिले आहेत. अनेक जागांबाबत प्रस्ताव मार्गी लागल्याची माहिती आहे.
स्वतंत्र प्रशासकीय अधिकारच नाही
महामार्ग पोलीस सुरक्षा विभागाला अपर महासंचालक, महानिरीक्षक, अधीक्षक, उपअधीक्षक, निरीक्षक ही पदे मंजूर आहेत. परंतु त्यांना स्वतंत्र बजेट, प्रशासकीय अधिकार नाहीत. क्राईम वर्क, परेड ग्राऊंड, कर्मचारी कल्याण, थेट शासकीय अनुदान, पदांची मंजुरी हे सुद्धा नाही. त्यामुळे या पथकांना संबंधित घटक पोलीस प्रमुखांवर अवलंबून राहावे लागते. त्यांचा पगारही तेथूनच निघतो. वाढता व्याप लक्षात घेता महामार्ग सुरक्षा विभागाला सर्वच बाबतीत स्वतंत्र अधिकार देण्याची मागणी केली गेली असून त्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्नही होत आहे.
विदर्भात १६ महामार्ग सुरक्षा पथके कार्यरत असून त्यात नव्या मंजुरीमुळे आणखी सहाची भर पडली आहे. या सर्व पथकांना कार्यालयासाठी शासकीय पण हक्काची जागा मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. नव्या भरतीत अधिकाधिक जागा नागपूर परिक्षेत्राला मिळविण्याचा प्रयत्न आहे.
- संजय शिंतरे
पोलीस अधीक्षक (महामार्ग सुरक्षा), नागपूर परिक्षेत्र.