भूखंड माफियांवर आणखी एक गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 10:21 PM2018-07-24T22:21:54+5:302018-07-24T22:22:34+5:30

लोहारा-वाघापूर बायपासवरील २५ हजार चौरस फुटाचा भूखंड हडपणाऱ्या राकेश यादव टोळीवर आणखी एक गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. या प्रकरणात भूखंड खरेदीत साक्षीदार म्हणून भूमिका वठविणाºया दोघांना अटक करण्यात आली आहे.

Another crime over land mafia | भूखंड माफियांवर आणखी एक गुन्हा

भूखंड माफियांवर आणखी एक गुन्हा

Next
ठळक मुद्देदोघांना अटक : २५ हजार चौरस फूट भूखंड हडपला

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लोहारा-वाघापूर बायपासवरील २५ हजार चौरस फुटाचा भूखंड हडपणाऱ्या राकेश यादव टोळीवर आणखी एक गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. या प्रकरणात भूखंड खरेदीत साक्षीदार म्हणून भूमिका वठविणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
गजानन नरहरी धोंडगे रा. मेहकर जि. बुलडाणा यांनी लोहारा पोलीस ठाण्यात २१ जुलै रोजी फिर्याद नोंदविली. त्यावरून भूमाफिया राकेश दीपक यादव रा. पवारपुरा, भोसा रोड यवतमाळ, त्याचे साथीदार नीलेश लहुराव बनोरे रा. जामनकरनगर उमरसरा यवतमाळ व नीलेश वलजीभाई उनडकर रा. हनुमान आखाडा चौक यवतमाळ या तिघांविरुद्ध भादंवि ४२०, ४६५, ४६८, ४६९, ४७१, ४७४, १२० (ब) भादंवि व ३४ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मुख्य आरोपी राकेश यादव अद्याप पसार असून त्याच्या दोन्ही साथीदारांना पोलिसांनी रात्रीच अटक केली. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चौकशीतून भूमाफियांच्या एकूणच कारनाम्यांचा, त्यात सहभागी पडद्यामागील चेहऱ्यांचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलीस वर्तवित आहे. राकेश यादव व त्याच्या अन्य साथीदारांविरुद्ध नुकताच यवतमाळ शहर पोलीस ठाण्यातही अशाच स्वरूपाचा फसवणूक व अफरातफरीचा गुन्हा नोंदविला गेला आहे. त्यात आतापर्यंत एकच आरोपी अटक असून इतरांचा शोध सुरू आहे.
गजानन धोंडगे यांचा लोहारा-वाघापूर बायपासवर २५ हजार चौरस फुटाचा भूखंड आहे. हा भूखंड राकेश यादव व टोळीने बनावट मालक उभा करुन परस्पर त्याची खरेदी करुन घेतली. त्यासाठी बोगस आधार कार्ड, पॅन कार्ड व अन्य कागदपत्रांचा वापर केला गेला. गैरमार्गाने खरेदी करून घेतलेल्या या एकाच भूखंडावर दोन बँकांमधून एकूण सात कोटी रुपयांचे कर्ज उचलले गेले. प्रत्यक्षात या भूखंडाची किंमत अडीच ते तीन कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.
भूखंड घोटाळ्याची चौकशी एसआयटी (विशेष तपास पथक) मार्फत सुरू आहे. या चौकशीत आणखी किती तरी प्रकरणे पुढे येण्याची शक्यता एसआयटीचे प्रमुख यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तविली आहे.
भूखंडधारकांची तलाठ्यांकडे गर्दी
‘लोकमत’ने यवतमाळातील भूखंड घोटाळा उघडकीस आणल्यानंतर एका पाठोपाठ फसवणुकीची प्रकरणे उघड होत असून त्यात गुन्हेही नोंदविले जात आहे. भूखंड हडपण्याचे प्रकार पाहता कित्येक भूखंड मालकांनी आपली स्थावर मालमत्ता सुरक्षित आहे की नाही, ती खरोखरच आपल्या नावावर आहे का की परस्परच कुणी त्याची विल्हेवाट लावली, याची खातरजमा करण्याचा सपाटा लावला आहे. त्यासाठी संबंधित तलाठी कार्यालय गाठून सातबारा मिळविला जात आहे. याशिवाय फेरफार नोंदी तपासून दुय्यम निबंधक (खरेदी-विक्री) कार्यालयातूनही खातरजमा करून घेतली जात आहे. या तपासणीत आणखी काही मोठी प्रकरणे उघडकीस येणार असल्याची माहिती आहे.
पुन्हा दोन गुन्हे प्रक्रियेत
भूमाफियांचे अनेक कारनामे दरदिवशी एसआयटीपुढे येत आहेत. त्यातूनच या माफियांविरोधात आणखी दोन गुन्हे प्रक्रियेत आहेत. केवळ संबंधित आवश्यक कागदपत्रे फिर्यादीकडून प्राप्त होण्याची पोलिसांना तेवढी प्रतीक्षा आहे.

Web Title: Another crime over land mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा