आणखी एका बिबट्याचा मृत्यू
By admin | Published: January 20, 2015 10:42 PM2015-01-20T22:42:32+5:302015-01-20T22:42:32+5:30
तालुक्यातील हातणी शिवारातील माळेगाव पांदण रस्त्यावर मंगळवारी दुपारी बिबट्याचा मृतदेह आढळला. यापूर्वी ११ जानेवारीला ब्रह्मनाथ शिवारात संशयास्पद स्थितीत बिबट्याचा मृतदेह आढळला होता.
दारव्हा : तालुक्यातील हातणी शिवारातील माळेगाव पांदण रस्त्यावर मंगळवारी दुपारी बिबट्याचा मृतदेह आढळला. यापूर्वी ११ जानेवारीला ब्रह्मनाथ शिवारात संशयास्पद स्थितीत बिबट्याचा मृतदेह आढळला होता. आठवड्याभरात एकाच परिक्षेत्रात दोन बिबट्याचे मृतदेह आढळल्याने वनविभाग चांगलाच हादरला आहे.
ब्रह्मनाथ शिवारातील संशयास्पद स्थितीत आढळलेल्या बिबट्याच्या मृत्यूचे कारण अद्याप उलगडले नाही. याचा तपास सुरू असताना मंगळवारी दुपारी हातणी शिवारातील माळेगाव पांदण रस्त्यावर नर जातीचा बिबट मृत अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. या बिबटाचा तीन दिवसापूर्वी मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. एकाच वनपरिक्षेत्रात सलग दोन घटना उघडकीस आल्याने वनविभागाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे दोन्ही घटनेतील बिबट्याचा मृतदेह कुजन्याच्या प्रक्रियेत आल्यानंतरच त्याची माहिती उघड झाली.
या दोन्ही घटनेचे एकमेकाशी सार्धम्य असल्याने वनविभागापुढचे आव्हान वाढले आहे. हातणी व माळेगाव शिवारात ग्रामस्थांनी तीन बिबट पाहिल्याचे सांगितले जाते. यापैकी एक मादी बिबट असून, तिच्या सोबत दोन पिल्ले पाहण्यात आल्याची परिसरात चर्चा आहे. या तीन बिबटापैकी दोन बिबटाचा सारख्याच पद्धतीने मृत्यू झाल्याने संशय वाढला आहे. वनविभाग या घटनेचा कसा उलगडा करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)