बोरगावात एकाच जागी खोदली दुसरी विहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 10:05 PM2017-10-23T22:05:39+5:302017-10-23T22:06:03+5:30
‘राकाधाका’मधून खोदलेल्या विहिरीच्याच ठिकाणी मग्रारोहयोतून दुसरी विहीर खोदल्याचा प्रकार उघडकीस आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ‘राकाधाका’मधून खोदलेल्या विहिरीच्याच ठिकाणी मग्रारोहयोतून दुसरी विहीर खोदल्याचा प्रकार उघडकीस आला. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत खुद्द प्रशासनानेच याची कबुली दिल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे प्रकार झाल्याची शंका बळावली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची बैठक झाली. श्रीधर मोहोड यांनी यवतमाळ तालुुक्यातील बोरगाव येथील विहिरीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मग्रारोहयोच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाºयांनी तेथे राकाधाकामधून खोदलेल्या विहिरीवरच मग्रारोहयो अंतर्गत दुसरी विहीर खोदल्याचे कबूल केले. त्यामुळे संबंधितांचे देयक अदा करण्यात आले नसल्याचे सांंगितले. त्यावर मोहोड यांनी राकाधाकामधील कुपनांची माहिती मागितली असता प्रशासनाजवळ उत्तरच नव्हते.
या विहिरीचे संपूर्ण रेकॉर्डच गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. परिणामी तेथे राकाधाकामधून विहीर खोदण्यात आल्याचा कोणताच पुरावा सध्या प्रशासनाकडे नाही. त्यामुळे मग्ररोहयोतील विहिरीचे देयक तत्काळ अदा करण्याची मागणी श्रीधर मोहोड यांनी केली. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अध्यक्ष माधुरी आडे यांनी दिले. गजानन बेजंकीवार यांनी पाटणबोरी येथील दलित वस्तीतील कामांच्या चौकशीचा अहवाल हॉटेलात बसून तयार करण्यात आल्याचा आरोप केला. तेथील ग्रामपंचायत जागेवर अतक्रिमणाच्या मुद्दावरून मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी अधिकाºयांना पाठीशी घालण्याचा कोणताही हेतू नसून ते माझे नातेवाईक नसल्याचे स्पष्ट केले. मोहोड यांनी सीईओ अधिकाºयांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला होता. बैठकीला बांधकाम व अर्थ सभापती निमीष मानकर, महिला व बालकल्याण सभापती अरूणा खंडाळकर, शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे, जया पोटे, राम देवसरकर, पंकज मुडे उपस्थित होते.
मालमत्तांची माहितीच नाही
जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मालमत्तांची माहिती अद्याप संकलित झाली नाही. खाते प्रमुख व नेर पंचायत समितीने मालमत्तांची माहिती सादर केली. १५ पंचायत समितींनी अद्याप माहिती दिली नाही. जया पोटे यांनी शिक्षण विभागातील रिक्त पदांचा प्रश्न उपस्थित केला. महिला व बालकल्याण सभापती अरूणा खंडाळकर यांनी मच्छिंद्रा शाळेवरील एक शिक्षक दोन वर्षांपासून गैरहजर असल्याचा आणि गौराळा रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला. राम देवसरकर यांनी कृषी विकास अधिकारी उपस्थित नसल्याकडे लक्ष वेधले. तसेच अंशकालीन निदेशक, ब्राम्हणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे हस्तांतरण, वसतिगृहांच्या अनुदान वाटपाचा मुद्दा उपस्थित केला. बांधकाम सभापती निमीष मानकर यांनी पुसदमधील १९ गावांमधील तीन लाखांच्या सौर पथदिवे खरेदीचा मुद्दा उपस्थित केला. याप्रकरणी समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.