शिक्षणच ठरणार शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरील उत्तर
By admin | Published: December 31, 2015 02:47 AM2015-12-31T02:47:56+5:302015-12-31T02:47:56+5:30
गेल्या काही काळापासून मराठवाड्यात दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
भारतीय जैन संघटना : शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना पुण्यात शिकविणार
यवतमाळ : गेल्या काही काळापासून मराठवाड्यात दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे तेथील मुलांच्या शिक्षणाची आबाळ टाळण्यासाठी २३० मुलांना वाघोली, पुणेच्या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात आसरा देण्यात आला आहे. ही मुले उत्तम शिक्षण घेऊन आयुष्य घडवत आहेत. मराठवाड्यासोबतच विदर्भातील शेतकऱ्यांची परिस्थितीही अत्यंत शोचनीय आहे. विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आणि होत आहेत. त्यामुळे यवतमाळवर भारतीय जैन संघटनेने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ५० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प, पुणे येथे समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांनी आपल्या मुलांच्या भवितव्यासंदर्भात भारतीय जैन संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पुनर्वसन प्रकल्पाचा उद्देश
शेतकरी आत्महत्यांची जी विविध कारणे आहेत, त्यामध्ये शिक्षणाचा अभाव हेही एक महत्त्वाचे कारण आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था पैशाच्या किंवा वस्तूंच्या रूपात मदत करीत आहेत. सरकारही कर्ज कमी करणे किंवा कर्जमाफी करणे अशा माध्यमातून प्रयत्नरत आहे. मात्र, हे उपाय तात्पुरत्या स्वरुपाचे आहेत. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने प्रगत करायचे असेल तर या समाजात शिक्षणाचा टक्का वाढविण्याची गरज आहे. पैशाअभावी शेतकऱ्यांची मुले योग्य त्या पद्धतीने शिक्षण घेऊ शकत नाही.
शिक्षणाचा अभाव असल्याने समोर आलेल्या आर्थिक अडचणीला किंवा सामाजिक-कौटुंबिक समस्यांना कसे तोंड द्यावे, याचे उत्तर शेतकऱ्यांना गवसत नाही. त्यामुळेच ते आत्महत्येच्या निर्णयाकडे वळतात. ही स्थिती बदलण्यासाठी शेतकरी समाजात शिक्षणाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. म्हणूनच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांना वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात सहभागी करून घेण्यात येणार आहे.
ही शिक्षित झालेली मुले निश्चितच आपल्या समाजात जीवनाविषयीचा सकारात्मक विचार पेरण्यासाठी सहाय्यभूत ठरतील, असा विश्वास भारतीय जैन संघटनेला वाटतो.
मुलींना समानतेची संधी
शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पात शेतकऱ्यांच्या मुलींनाही समान संधी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांसोबतच विद्यार्थिनींचीही निवड करून त्यांना योग्य ते शैक्षणिक वातावरण या प्रकल्पात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकरी वर्गातील महिलांमध्ये शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात अभाव असल्याची बाब पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी मुलींची प्राधान्याने निवड करून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह सुरक्षेचीही हमी घेतली जाणार आहे. याच मुली आपल्या समाजात महिला सबलीकरण घडवून आणि जीवनाविषयचा सकारात्मक संदेश पोहोचवून शेतकऱ्यांची स्थिती सुधारू शकतील, असा विश्वास भारतीय जैन संघटनेने व्यक्त केला.