महिलांच्या सुरक्षेसाठी ‘अँटी रेप सेफ्टी सिस्टीम’, पुसदच्या अजय विश्वकर्मा यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 12:20 PM2023-03-16T12:20:15+5:302023-03-16T12:22:17+5:30
महिलांना हे ॲप्रन परिधान केल्यानंतर सुरक्षित वाटेल
अखिलेश अग्रवाल
पुसद (यवतमाळ) : येथील इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असलेल्या अजय विश्वकर्मा या तरुणाने महिलांवरील वाढत्या अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी ‘अँटी रेप सेफ्टी सिस्टम’ विकसित केली आहे. महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराचे प्रमाण बरेच वाढले आहे. यावर तोडगा म्हणून ही सिस्टम तयार करण्यात आली आहे.
अजयने नागपूर येथील इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स या संस्थेमधून डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक कोर्स केला. त्याने विकसित केलेली ‘अँटी रेप सेफ्टी ॲप्रन’ पूर्णपणे सुरक्षित आहे. एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर ही सिस्टम ३६ तास सतत चालते. एका ॲप्रनची किंमत केवळ ४०० ते ६०० रुपये असेल. या ॲप्रनचे उत्पादन सुरू करण्यापूर्वी डीआरडीओची परवानगी घेणे अनिवार्य आहे, असे अजयने सांगितले.
‘अँटी रेप सेफ्टी सिस्टम म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते
उन्हाळ्यात महिला उष्माघातापासून बचाव करण्यासाठी सनकोट वापरतात. अजयने तयार केलेली ही सिस्टम अर्थात बलात्कारविरोधी सुरक्षा यंत्रणादेखील त्याच प्रकारे कार्य करते. ज्या महिला त्यांच्या कार्यालयातून रात्री उशिरा घरी पोहोचतात, त्यांची काळजी घेण्यासाठी हे डिझाइन केले आहे. महिलांना हे ॲप्रन परिधान केल्यानंतर सुरक्षित वाटेल. हे एक इन्सुलेटेड ॲप्रन आहे. त्यात ही प्रणाली स्थापित केली जाईल. कोणत्याही चुकीच्या कृतीच्या संबंधात जेव्हा एखादा व्यभिचारी एखाद्या महिलेला स्पर्श करील, तेव्हा त्याला सिस्टममधून विद्युत प्रवाहाचा (हाय फ्रिक्वेन्सी करंट) झटका बसेल. तो त्वरित महिलेच्या दूर होईल.
तिला पुन्हा स्पर्श करण्याची हिंमत करणार नाही. त्याच वेळी या जॅकेटमधील जीएसएम सिस्टम त्या महिलेच्या घरी फोन कॉल करील. त्यामुळे ती व्यक्ती पळून जाईल. प्रणालीची सर्व पॅरामीटर्सवर चाचणी केली गेली आहे. त्याचा नमुना तयार आहे. प्रणालीद्वारे उत्पन्न विद्युत प्रवाहामुळे वापरकर्त्यांचे शरीर अप्रभावित राहते. डीआरडीओ किंवा कोणत्याही सरकारी प्रमाणित एजन्सीने प्रमाणित केल्यानंतरच त्याचे काम सुरू करता येईल. या जॅकेटची किंमत अगदी गरीब महिलांच्या बजेटनुसार राहील.
महिलांच्या सुरक्षितेसाठी ‘अँटी रेप सेफ्टी सिस्टम’ तयार केली आहे. नोकरी व कामासाठी जाणाऱ्या महिलांच्या सुरक्षितेसाठी हे एक इन्सुलेटेड ॲप्रन आहे. एखाद्या व्यक्तीने वाईट हेतूने महिलेला स्पर्श केल्यास त्याला हाय फ्रिक्वेन्सीचा झटका लागेल. या जाकीटची किंमत केवळ ४०० ते ६०० रुपये राहील.
- अजय विश्वकर्मा, पुसद