दीडशे वर्षापूर्वीच्या पुस्तकांची ‘अॅन्टीक लायब्ररी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 06:00 AM2020-03-21T06:00:00+5:302020-03-21T06:00:29+5:30
जिल्हा कचेरीची ब्रिटीशकालीन वास्तू न्याहळता-न्याहळता ते बुधवारी रेकॉर्ड रुममध्ये धडकले. दगडी चिरेबंदी पद्धतीच्या या रेकॉर्ड रुमचा कोपरान्कोपरा जुने दस्तावेज, मळकट कागद यांनी भरलेला. याच ढिगाऱ्यात हात घालून एक-एक कागद पाहता पाहता जिल्हाधिकाऱ्यांना चक्क दीडशे वर्षांपूर्वीची पुस्तके सापडली. एक-दोन नव्हे एक हजारांपेक्षा जास्त पुस्तके सिंह यांनी हुडकून काढली.
अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी बैठकांवर बैठकांचे सत्र सुरू आहे. कोरोनाग्रस्त शोधणे, कोरोना रोखणे, कोरोना नष्ट करणे यासाठीच चोवीसही तास जिल्हाधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. मात्र या धावपळीतही त्यांनी चक्क दीडशे वर्षांपूर्वीच्या अनमोल पुस्तकांचा खजिना शोधून काढला. नुसता शोधलाच नाही तर आता या पुस्तकांची जिल्हा कचेरीतच अॅन्टीक लायब्ररी तयार करण्यासाठी पावले उचलली आहे.
महिनाभरापूर्वीच जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यवतमाळात रुजू झाले. आल्या-आल्या त्यांची पहिली नजर जिल्ह्यातील शाळांच्या अवस्थेवर पडली. त्यासोबतच ब्रिटीशकाळापासूनचा यवतमाळचा इतिहासही त्यांचे लक्ष वेधून गेला. त्यामुळेच जिल्हा कचेरीची ब्रिटीशकालीन वास्तू न्याहळता-न्याहळता ते बुधवारी रेकॉर्ड रुममध्ये धडकले. दगडी चिरेबंदी पद्धतीच्या या रेकॉर्ड रुमचा कोपरान्कोपरा जुने दस्तावेज, मळकट कागद यांनी भरलेला. याच ढिगाऱ्यात हात घालून एक-एक कागद पाहता पाहता जिल्हाधिकाऱ्यांना चक्क दीडशे वर्षांपूर्वीची पुस्तके सापडली. एक-दोन नव्हे एक हजारांपेक्षा जास्त पुस्तके सिंह यांनी हुडकून काढली.
या पुस्तकांमध्ये फिक्शन, नॉनफिक्शन प्रकारातील पुस्तकांचा समावेश असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. बहुतांश आयएएस, आयपीएस स्पर्धा परीक्षांसाठी उपयोगी पडतील अशी पुस्तके यात आहे. त्यात विविध प्रकारचे कायदे, दस्तावेज नोंदणीसाठी आवश्यक असणारी माहिती पुरविणारी पुस्तके यांचाही या खजिन्यात समावेश आहे.
हा दुर्मिळ खजिना पाहून जिल्हाधिकारी एम.डी. सिंहही चकीत झाले. त्यांनी रेकॉर्ड रुमच्या कर्मचाºयांना त्याच्या जतनाविषयी सूचना केल्या. या पुस्तकांचे व्यवस्थित बार्इंडींग व इतर कामांसाठी पाच लाख रुपये दिले जाणार आहे. सोबतच एक झेरॉक्स मशीन दिली जाणार आहे. शनिवारी रेकॉर्ड रुममध्ये आणखी दोन कर्मचाºयांची नेमणूक करून पुस्तकांचे शोधकाम केले जाणार आहे. त्यानंतर या पुस्तकांची अॅन्टीक लायब्ररी साकारली जाईल, असे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सांगितले.
ब्रिटीशकाळाचा आणि त्यापूर्वीचाही यवतमाळ शहराला इतिहास आहे. त्याचा अंदाज जिल्हाधिकाºयांना रेकॉर्ड रुममध्ये फिरताना आला. यावेळी त्यांच्या हाती १८८० मधील दस्तावेज लागले. तब्बल १४० वर्षापूर्वी नागोबा आणि ज्ञानोबा नावाच्या इसमांनी केलेली फेरफार नोंदणी पाहून आणि ती नोंदणी आजही जतन केल्याचे पाहून जिल्हाधिकारी चकीत झाले. आपला आनंद व्यक्त करताना जिल्हाधिकारी म्हणाले, या फेरफारावर तत्कालीन डिस्ट्रीक्ट रजिस्ट्रार एलिअट यांची २१ आॅगस्ट १८८० रोजी झालेली स्वाक्षरी आहे. विशेष म्हणजे हा दस्तावेज इंग्रजी भाषेसोबतच पाली भाषेतही नमूद आहे. १८७० पासून तर आजपर्यंत येथे आलेल्या सर्व जिल्हाधिकाºयांची यादी तयार केली जाईल. मात्र यवतमाळ पूर्वी केवळ वणी जिल्ह्यातील शहर होते. या जिल्ह्याला त्यावेळी वून असेही संबोधले जायचे. त्यामुळे १८७० पूर्वीही येथे कोणकोणते अधिकारी येऊन गेले, त्यांचीही संपूर्ण माहिती शोधून अॅन्टीक लायब्ररीत उपलब्ध ठेवली जाईल.