सोयाबीन दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:47 AM2021-09-21T04:47:48+5:302021-09-21T04:47:48+5:30
पांढरकवडा तालुक्यात यावर्षी साडेसात हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीला आले असून, तालुक्यातील काही भागांत ...
पांढरकवडा तालुक्यात यावर्षी साडेसात हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीला आले असून, तालुक्यातील काही भागांत निघणेदेखील सुरू झाले आहे. शेतकऱ्यांचा माल निघाला की, दरवर्षी व्यापारी भाव पडतात. सोयाबीनच्या दरात याहीपेक्षा मोठी घसरण होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. गेल्या सलग दोन हंगामात सोयाबीन काढणीवेळी अतिवृष्टी झाल्यामुळे उत्पादनात प्रचंड घट आली होती. सोयाबीनचा दर्जाही खालावला होता. अनेक शेतकऱ्यांचे उत्पादन एकरी किलोच्या घरात आले होते. त्यामुळे यंदा खरीप हंगामात सोयाबीनच्या बियाणाचा तुटवडा झाला होता. सर्वत्र बियाणाची चणचण भासली. महाबीजने बियाणाचे दर वाढविले नसले तरी खासगी कंपन्यांनी दरात मोठी वाढ केली होती, तर हंगामात व्यापाऱ्यांनी खरेदी केलेले सोयाबीन बियाणे म्हणून उपयोगात आणले. त्यामुळे पेरणीच्या वेळी सोयाबीनचे दर प्रचंड वधारले. आठ ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले होते. बियाणाचे दर तर १६ ते १७ हजार रुपये क्विंटलवर गेले होते. दरम्यान, ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन जपून ठेवले होते, त्यांनी तेच बियाणे पेरणीसाठी वापरले. हंगामात शेतकऱ्यांनी चार ते साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटलदरम्यान सोयाबीनची विक्री केली. बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांनी पुढे भाव वाढतील म्हणून सोयाबीन विक्री थांबविली. यावर्षी पेरणीपासून सोयाबीनचे दर सातत्याने वाढत गेले; परंतु या वाढीव दराचा लाभ व्यापाऱ्यांनाच झाला.
बॉक्स : नवीन सोयाबीन येताच दरात घसरण
सध्या सोयाबीन काढणीला आले असून, काही भागांत ते काढले जात आहे. सध्या सोयाबीनला मिळत असलेले बऱ्यापैकी दर आणि आर्थिक तंगीमुळे शेतकरी निघालेले सोयाबीन थेट बाजारपेठेत आणत आहेत. बाजारपेठांमध्ये नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे; परंतु आवक सुरू होताच सोयाबीनच्या दरात तीन ते चार हजार रुपयांनी घसरण झाली आहे. चार दिवसांपूर्वी ११ हजारांवर गेलेले सोयाबीन आता कमाल सहा ते सात हजारांवर आले आहे.