पावसाची दडी, अनेकांनी पेरण्या आटोपल्याने चिंता; हवामानाचा अंदाज खोटा ठरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2022 08:53 PM2022-06-18T20:53:32+5:302022-06-18T20:53:54+5:30

Yawatmal News यंदा पावसाने हूल दिल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पेरण्या केलेले शेतकरी चिंतेत पडले आहेत.

Anxiety over heavy rains; The weather forecast turned out to be false |  पावसाची दडी, अनेकांनी पेरण्या आटोपल्याने चिंता; हवामानाचा अंदाज खोटा ठरला

 पावसाची दडी, अनेकांनी पेरण्या आटोपल्याने चिंता; हवामानाचा अंदाज खोटा ठरला

googlenewsNext
ठळक मुद्दे पावसाअभावी बियाणे करपण्याची शक्यता

यवतमाळ: यावर्षी हवामान खात्याचा अंदाज सपशेल खोटा ठरला. यंदा मान्सूनचे आगमन वेळेआधी होणार, असे भाकित करण्यात आल्याने व जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही भागात पावसाळी वातावरण तयार झाल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची टाेबणी केली खरी; परंतु जून महिन्याचा पंधरवडा उलटल्यानंतरही पाहिजे त्या प्रमाणात वणी तालुक्यात पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे जमिनीतच करपून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दमदार पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये, असे आवाहन कृषी विभागाने वारंवार केले असले तरी, वणी तालुक्याच्या अनेक भागातील शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर कपाशी टोबणी उरकली. त्यानंतर या तालुक्यातील काही भागात केवळ दोनदा पाऊस पडला. सर्वाधिक पाऊस शिंदोला, कायर, रासा, गणेशपूर, वणी या भागात कोसळला. आतापर्यंत महसूल मंडळात ५० मिमी पाऊस कोसळल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्या शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरच कपाशीची टोबणी उरकली. आता पाऊस नसल्याने शेतात असलेल्या जलस्त्रोताद्वारे कपाशीला पाणी दिले जात आहे. ज्या कोरडवाहू शेतकऱ्यांनी पाऊस येईल, या आशेने कपाशीची टोबणी केली, त्या शेतकऱ्यांची टोबणी उलटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 या भागात पाहिजे त्या प्रमाणात पाऊसच नसल्याने अद्यापही उकाडा कायम आहे. या उकाड्याने नागरिक हैराण आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांनी खते व बियाणांची खरेदी करून त्याची साठवण आपल्या घरी करून ठेवली आहे. मात्र पाऊसच नसल्याने पेरण्या खोळंबल्या आहे. वणी तालुक्यात आतापर्यंत तीन हजार ८९५ हेक्टरवर कपाशी, ६३५ हेक्टरवर तूर, ४५ हेक्टरवर सोयाबीन, अशा एकूण चार हजार ५७५ हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.

बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी - कृषी विभाग

वणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी किमान ७५ ते १० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. तसेच बीज प्रक्रिया व उगवण क्षमता चाचणी करूनच सोयाबीन पिकाची पेरणी करावी, असे आवाहन वणी तालुका कृषी अधिकारी सुशांत माने यांनी केले आहे.

Web Title: Anxiety over heavy rains; The weather forecast turned out to be false

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती