खून करून अपघाताचा देखावा
By admin | Published: March 6, 2015 02:16 AM2015-03-06T02:16:52+5:302015-03-06T02:16:52+5:30
वणी-शिरपूर मार्गावरील निलगीरी वनालगत मंदरजवळील एका पुलाजवळ गेल्या २३ फेब्रुवारीला प्रशांत चिंतामण रणदीवे (३१) रा.उकणी, या युवकाचा मृतदेह आढळून आला होता.
वणी : वणी-शिरपूर मार्गावरील निलगीरी वनालगत मंदरजवळील एका पुलाजवळ गेल्या २३ फेब्रुवारीला प्रशांत चिंतामण रणदीवे (३१) रा.उकणी, या युवकाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी याप्रकरणी प्रथम अपघाताचा गुन्हा दाखल केला होता. मात्र तपासाअंती तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली.
प्रशांत चिंतामण रणदीवे हा युवक २२ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजतापासून उकणी येथून आपल्या एम.एच.२९-डब्ल्यू.१८३८ क्रमांकाच्या दुचाकीने बाहेर गेला होता. तो दुसऱ्या दिवशी २३ फेब्रुवारीला वणीवरून शिरपूरकडे जाणाऱ्या मार्गावरील निलगीरी वनाजवळील एका नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाजवळ तो दुचाकीसह पडून असल्याचे आढळले होते. घटनेची माहिती कळताच ठाणेदार अस्लम खान ताफ्यासह तेथे पोहोचले होते. स्थळ पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. मृतकाच्या डोक्यावर आणि पोटावर जखमा आढळून आल्या होत्या. प्रशांतचा मृतदेह रूग्णालयात आणल्यानंतर तेथे नातेवाईकांची एकच गर्दी झाली होती. काहींनी पोलीस ठाण्याकडे धाव घेत हा घातपात असल्याचा दावा केला होता. मात्र प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे आढळल्याने पोलिसांनी त्यावेळी अपघाताची नोंद केली होती. तथापि मृतक प्रशांतच्या डोक्याला व पोटाला गंभीर मार असल्याने पोलीस खुनाच्या दिशेनेही तपास करीत होते. या दरम्यान मृतकाच्या वडिलांनी तक्रार करून हा घातपाच असल्याचा दावा केला होता. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. काल बुधवारी गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्यांनी पोलीस अधीक्षकांशी बोलून याप्रकरणी कारवाई करण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर लगेच रात्री यवतमाळ येथील गुन्हे अन्वेषण पथकाने निळापूर येथील अनिल गोविंदा बोढाले नामक युवकाला ताब्यात घेतले. त्यानंतर वणी पोलिसांनी गुरूवारी पूजा अनिल बोढाले (२७), विनोद मिलमीले (३२) रा.विरकुंड, वामन गोपाल पाचभाई (४५) रा.शेलू या चौघांना गुरूवारी अटक केली. न्यायालयाने त्यांना ८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले. यातील अनिल बोढाले हा यापूर्वी भाजपा युवा मोर्चाचा निळापूर शाखा अध्यक्ष होता, अशी माहिती आहे. तथापि अनिल सध्या कोणत्याही पदावर नसल्याचे सांगण्यात आले. (कार्यालय प्रतिनिधी)
पोलिसांची वर्चस्वासाठी लढाई
या प्रकरणाचा तपास येथील ठाणेदार अस्लम खान यांच्याकडे होता. त्यांनी डीबी पथकातील साजीद व इतर सदस्यांसह या प्रकरणातील कॉल डिटेल्स प्राप्त केले. त्यावरून ते आरोपींपर्यत पोहोचण्याच्या बेतात होते. याबाबत काही वरिष्ठांना माहितीही देण्यात आली. दरम्यान गृह राज्यमंत्र्यांचा दौरा आला. त्यात बुधवारी येथील पोलीस व्यस्त होते. नेमकी हिच संधी साधून गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजय पुजलवार, पतंगे, गजानन डोंगरे, यादव, साठवणे, जागृत आदींनी आपली मोहीम फत्ते केली अन् अनिल बोढाले याला ताब्यात घेतले. यावरून पोलिसांमध्येच वर्चस्वाची लढाई रंगली. गुन्हा कोणी उघडकीस आणला, आरोपी कोणी ताब्यात घेतला, यावरून त्यांच्यातच चांगली ‘तू-तू,मै-मै’ झाली. अखेर अनिलला वणी पोलिसांच्या ताब्यात देऊन गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक रात्रीच यवतमाळला परत गेले.
‘लोकमत’चा अंदाज ठरला खरा
प्रशांतच्या मृत्युप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी २३ फेब्रुवारीला गर्दी केली होती. मात्र तेव्हा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल प्राप्त होताच, याप्रकरणी पुढील निर्णय घेतला जाईल, असे पोलिसांनी सांगितले होते. ‘लोकमत’ने तेव्हाच अपघाताचा गुन्हा नोंद होऊनही पोलीस खुनाच्या दिशेनेही तपास करीत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. आता ते वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे. पोलिसांनी आरोपींना गाफील ठेवण्यासाठीच ही खेळी केली. त्यामुळे आरोपी निश्चिंत होते.
अशी घडली घटना
या घटनेतील मृतक प्रशांतचे दोन वर्षांपासून पूजाशी प्रेमसंबंध होते. गेले काही दिवस मृतकाचे पूजाला सतत भ्रमणध्वनी येत होते. त्याला कंटाळून तिने याबाबत कुटुंबियांना अवगत केले होते. नंतर संगनमत करून या चौघांनी मृतक प्रशांतला २३ फेब्रुवारीला सायंकाळी निळापूर येथे घरी बोलविले. तेथे रात्री १0 वाजताच्या सुमारास प्रशांतला तिघांनी पकडून ठेवले. एकाने त्याच्या डोक्यावर वार केले. त्यात प्रशांत ठार झाला. नंतर त्याचा मृतदेह चादरीत गुंडाळून यापैकी दोघांनी दुचाकीवर मधात ठेवून घुग्गुस मार्गावरील निलगिरी वनाजळील एका निर्माणाधीन पुलाजवळ टाकून तेथे अपघाताचा देखावा निर्माण केला. घरी परत आल्यानंतर त्यांनी चादर व रक्ताने माखलेले कपडे, तसेच मृतकाचा मोबाईल निळापूर येथील शेतात जाळून अपुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.