कर्तव्यावर हजर परंतु लेखणी मात्र बंद
By admin | Published: July 21, 2016 12:09 AM2016-07-21T00:09:33+5:302016-07-21T00:09:33+5:30
ते कर्तव्यावर हजर आहेत. मात्र त्यांची लेखणी बंद आहे. त्यांचा पगारही सुरूच आहे. मात्र काम काहीच नाही.
यवतमाळ : ते कर्तव्यावर हजर आहेत. मात्र त्यांची लेखणी बंद आहे. त्यांचा पगारही सुरूच आहे. मात्र काम काहीच नाही. कार्यालयात स्वाक्षरी करून लिपिकांचे हे आंदोलन आता चर्चेचा विषय ठरले आहे.
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने गेल्या १५ जुलैपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या मागण्या न्याय्य आहेत. त्यासाठीच त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. गेल्या पाच दिवसांपासून त्यांचे आंदोलन सुरू आहे. शासनावर आंदोलनाचा दबाव वाढत आहे. त्यांच्या मागण्या मान्य होण्याची चिन्हे दिसू लागली, असा संघटनेचा दावाही आहे. त्यांच्या समस्या सुटाव्यात, अशीच त्यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांची अपेक्षाही आहे. या आंदोलनात गेल्या पाच दिवसांपासून जिल्हा परिषदेतील अनेक लिपिक सहभागी आहे. ते कार्यालयात येतात. मस्टरवर स्वाक्षरी करतात. मात्र आपली लेखणी बंद ठेवतात. लिहिण्याचे कोणतेही काम ते करीत नाही. कामच नसल्याने अनेक लिपिक आपापल्या जागी आढळत नाही. तथापि काही लिपिक खुर्चीवर आढळतात. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना काही लिपिक कार्यालयात हजर आढळले. त्यांना त्यांनी गांधीगिरी करून गुलाबपुष्प दिले. अद्याप हे आंदोलन सुरूच आहे.
कोणतेही काम न करता, लेखणी बंद करणाऱ्या लिपिकांचा पगार मात्र सुरूच आहे. कारण ते मस्टरवर स्वाक्षरी करतात. त्यामुळे हे अभिनव आंदोलन जिल्हा परिषद वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. आंदोलनात सहभागी नसलेले लिपिक या आंदोलनाबाबत विविध चर्चा करीत आहे. शासनाचा पगार घेत सुरू असलेले हे आंदोलन वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे. (शहर वार्ताहर)